Manoj Jarange Patil | शिवरायांसमोर नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांचं मराठा समजाला साकडं, मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर भर मंचावर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं. त्यांच्या या कृतीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या आझाद मैदानात दसरा मेळाव्यात भाषण करताना सर्वात महत्त्वाची भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं. आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आपण स्वत: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांनी भर मंचावर भाषण सोडलं आणि ते मंचावर एका बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेले. ते शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर ते पुन्हा भाषण करण्यासाठी मंचाच्या मध्यभागी आले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समजाला आरक्षण मिळवून देणार, असं आश्वासन दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर मनोज जरांगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे बरोबर बोलले आहेत. कुणाचं आरक्षण काढून घेणार नाही आणि सर्वांना आरक्षण देणार. मंडळ कमिशनने ओबीसींना 14 टक्के आरक्षण दिलं होतं. त्यामुळे त्यांचं आरक्षण काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री जे म्हणाले ते बरोबरच आहे. आम्हाला त्यांचं आरक्षण नकोच आहे. मंडळ कमिशनने त्यांना कायदेशीर दिलेलं आरक्षण द्या. उर्वरित माझ्या मराठा समाजाचं आरक्षण आहे. पूर्वीपासून मराठा समाज ओबीसीत आहे. फक्त कुणी मान्य करत नव्हतं”, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
“मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन केलं. मी कार्यक्रमात असल्याने पाहिलं नाही. आमचा दिवसरात्र कार्यक्रम सुरु आहे. मला बघायला वेळ मिळाला नाही. पण त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“तुम्ही 50 टक्क्याच्या वर आरक्षण देणार असा काही प्रकार असेल तर मराठा समाजाला ते मान्य नाही. कारण ते आरक्षण टिकतंच नाही. तुम्ही किती दिवस आमच्या मराठा समाजावर अन्याय करणार? आम्ही सर्व निकष पार केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
“आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान ठेवला होता. आम्ही 40 दिवस दिले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा. कारण ते शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजात भावना झाली आहे. त्यांनी त्या शब्दांवर उतरावं. त्यांनी आज रात्रीत आरक्षण द्यावं. आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“आंदोलन थांबवण्याचा काहीच संबंध नाही. त्यांनी आमच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला. आम्ही मोठं मन दाखवून 40 दिवस दिला. आम्ही 10 दिवस जास्त दिले. त्यांनी शपथ घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत”, अशी भूमिका मनोज जरांगेंनी जाहीर केली.
“चर्चा भरपूर झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचं मोठं पाऊल आहे हे सत्य आहे. हे योग्य आहे. कारण आम्हाला मराठ्यांना माणुसकी माहिती आहे. पण आम्ही आंदोलन थांबवणार नाहीत. त्यांनी जे केलं ते कुणी केलं नसेल. त्यांचा आम्ही सन्मान करतो. पण आंदोलन मागे घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या कृतीला मराठा समाजाने सकारात्मक घेतलं आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.