मनोज जरांगे यांची गोड बोलून फसवणूक? कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन घेतली?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा जालन्याहून निघालेला मोर्चा आज लोणावळ्यात धडकला आहे. जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईत आला तेव्हा पोलिसांनी त्यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली. यावेळी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
मुंबई | 25 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज लोणावळ्यात धडकला आहे. त्यांचा मोर्चा आज वाशी येथे मुक्कामाला असणार आहे. पण वाशी पोहोचण्याआधी नवी मुंबईत पोलिसांनी त्यांची भेट घेतली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना भेट घेऊन मार्ग बदलण्याची विनंती केली. विशेष म्हणजे यावेळी कागदपत्रांवरील सहीचा विषय चर्चेत आला. मनोज जरांगे यांनी काही कागदपत्रांवर सही केल्याची माहिती समोर आली. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी सहीचा किस्सा सांगितला. कुणीतरी आपल्याला गोड बोलून, फसवणूक केली आणि सही नेली, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. संबंधित व्यक्तीने कोर्टाचे कागदपत्रे असल्याचं म्हणत दोन कागपत्रांवर सही केली. पण तरीसुद्धा मी आझाद मैदानातच उपोषणाला बसणार, असं मनोज जरांगे ठामपणाने म्हणाले.
“पोलिसांनी सूचवलेल्या मार्गावर मनोज जरांगे यांनी स्वाक्षरी केली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही तो विषय वेगळा आहे. सही घेऊन जाणारी व्यक्ती गोड बोलून सही घेऊन गेली. कोर्टाची सही घ्यायची आहे, असं ती व्यक्ती म्हणाली. मी ते कागदपत्रे वाचले नाहीत. एक कागद मराठीत होता तर दुसरी इंग्रजीत होता. मी सही केली. कोर्टाचं नाव काढलं की मी कोर्टाचा सन्मान करतो. म्हणून मी म्हटलं, सही करणं गरजेचं आहे. कारण आमचेसुद्धा माणसं कोर्टात जाणार आहेत ना. कारण न्यायालय आम्हालाही न्याय देणार आहे. त्यामुळे सही केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. त्यामुळे मी पटकन सही केली. मी कोर्टाचं समजून सही केली”, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
‘तू अशी फसवणूक करु नको’
“तुम्ही इकडे उपोषणाला बसा, तिकडे उपोषणाला बसा, अशा कागदावर त्यांनी सही नेली. पण मी आझाद मैदानातच उपोषणाला बसणार. त्यावर डीसीपी साहेब बोलले मी करतो. सही करणारा पोलीस होता की कोण होता ते माहिती नाही. त्याने झोपेच्या नादाच माझी सही घेतली. थांब तुझी आणि माझीपण भेट होईल. तू सही नेली असली तरी मी आंदोलनाला आझाद मैदानातच बसणार आहे. पण तो ऐकत असला ना टीव्हीवर, तू अशी फसवणूक करु नको. माझ्याशी गोड बोलून सही नेली. मी झोपेच्या नादात होतो, ते म्हणाले कोर्टाचं आहे, म्हणून मी सही केली. तरी मी त्याला म्हणालो, माझ्या नावाचे कशी सही? तो म्हणाला, तुम्ही मेन आहात, मग मी दणादणा सही करुन टाकली”, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
नवी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना काय विनंती केली?
“आम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटून विनंती केली आहे की, पळस्पे फाटेमार्ग जावून डाव्याबाजूला उरण फाटा आणि किल्ला जंक्शन हा मार्ग पकडला तर जो मुख्य सायन-पनवेल मार्ग आहे, त्या मार्गावर लोड येणार नाही. त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत. तसेच सुट्टीच्या दिवसामुळे त्या ठिकाणी मुंबईकडून येणारी गर्दी देखील जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यानंतर ते विचार करुन आम्हाला कळवणार आहेत”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
अयोजक काय म्हणाले?
“सर्वसामान्य नागरीक आणि प्रशासनाला त्रास होऊ नये या दृष्टीने सामंजस्यपणाने कोणता मार्ग योग्य आहे, आम्हालाही सोपा पडतो आणि त्यांनाही सोपा पडतो याबाबत निर्णय घेऊ. पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावर फार फरक नाही. 4 किमीचा फरक आहे. पोलीस आणि आयोजक दोन्ही मिळून यावर निर्णय घेऊ”, असं मराठा समाजाचे नवी मुंबईतील आयोजक म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“आम्हाला मार्ग माहिती नाही. त्यांचं म्हणणं आहे की, तिकडून मोठा दवाखाना आहे. आमच्या माणसांचं म्हणणं आहे की, एक रस्ता द्या. आमचं म्हणणं आहे, एक लेन द्या, आम्ही एका बाजूने जातो. आम्हाला आज वाशीला जायचं आहे. वाशीला मुक्काम करायचा आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.