दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : आरक्षणासाठी आम्ही शांततेचं आंदोलन करत आहोत. कुणीही उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ, तोडफोड करू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहेत. मराठा तरुणांना संयम आणि सबुरीचा सल्ला जरांगे पाटील देत आहेत. मात्र, आता मराठा तरुणांचा आरक्षणासाठीचा संयम सुटलेला पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनाच दणका दिला आहे. या तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली आहे.
मराठा तरूणांनी आज सकाळीच गुणरत्न सदावर्ते यांच्या घराकडे जाऊन ही तोडफोड केली. गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर येथे राहतात. क्रिस्टल टॉवरच्या पार्किंगमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. हे तीन तरुण हातात काठ्या घेऊन आले आणि त्यांनी अंदाधूंदपणे सदावर्ते यांच्या दोन गाड्यांच्या काचा फोडल्या. अत्यंत आक्रमक होत या तरुणांनी सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या तरुणांनी पार्किंगमधील इतर वाहनांना हात लावला नाही. फक्त सदावर्ते यांच्याच दोन्ही वाहनांची तोडफोड केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या.
एकूण तीन तरुण क्रिस्टल टॉवर येथे आले होते. या तिन्ही तरुणांच्या हातात काठ्या होत्या. त्यातील एक तरुण गेवराईचा सरपंच असून त्याचं नाव मंगेश साबळे असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणांनी जोरजोरात घोषणा देत वाहनांची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटकाव करत त्यांना अटक केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून त्यातून वाहनांची प्रचंड तोडफोड झाल्याचं दिसून येत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी नेहमीच मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिकाही कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील सभेलाही विरोध केला होता. जरांगे पाटील यांच्या सभेत राडा होणार असून जरांगे यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली होती. त्यामुळे जरांगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून सदावर्ते यांच्यावर टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी आपला राग व्यक्त करत सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे.