मुंबई : मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे उद्या (1 नोव्हेंबर 2020) संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चा महामुंबईकडून प्रसिद्धपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. मराठा समाजामध्ये असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी, सध्या आरक्षणाची आणि इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी, तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती महामुंबई तर्फे संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे (Maratha Kranti Morcha protest in Mumbai).
“मराठा आरक्षणाबाबत सरकारचा चाललेला गलथान कारभार आणि त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, नोकर भरती याबाबत होणारे नुकसान यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अशा परिस्थितीत आता मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही”, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा महामुंबईकडून मांडण्यात आली आहे.
मराठा सामाजाची ही संघर्ष यात्रा उद्या सकाळी दक्षिण मुंबई येथील लालबाग पासून सुरु होणार आहे. या यात्रेची सांगता संध्याकाळी ठाणे येथे होणार आहे. लालबाग येथून निघालेली ही संघर्ष यात्रा सायन, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, कन्नमवार नगर आणि भांडुप याठिकाणी थांबणार आहे. तेथील समन्वयक आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे (Maratha Kranti Morcha protest in Mumbai).
या संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सामील व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी तातडीने पावलं उचलावीत. अन्यथा समाज शांत बसणार नाही, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
“मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांकडून ज्याप्रमाणे बेताल वक्तव्य होत आहेत त्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चा महामुंबई करत आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपसमितीचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी सदर उपाय समितीतून तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा महामुंबईकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा : Maratha Reservation | मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी