Maratha Reservation : जरांगे पाटील यांच्या ‘त्या’ मागणीला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नाहीच; गिरगाव चौपाटीवर पुन्हा आवाज मराठ्यांचाच
पुन्हा एकदा मुंबईत मराठा आंदोलकांचा आवाज घुमला आहे. 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' आणि 'छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो'च्या घोषणांनी मराठा आंदोलकांनी संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर आज दणाणून सोडला.

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 12 ऑक्टोबर 2023 : बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाचा आवाज मुंबईत दुमदुमला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आज गिरगाव चौपाटीवर एकवटले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर दुमदुमून गेला होता. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात असतानाच हा मोर्चा मध्येच अडवण्यात आला. पोलिसांनी मराठा आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतलं.
मराठा क्रांती मोर्चाने आज सकाळी 8.30 वाजता या मोर्चाचं आयोजन केलं होतं. वर्षा निवासस्थानावर जाण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी 9 च्यानंतर एक एक करत शेकडो मराठा आंदोलक गिरगाव चौपाटीवर जमा झाले. शेकडो आंदोलकांनी हातात फलक घेतले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीचा मजकूर त्या फलकावर लिहिण्यात आला होता. अनेकांच्या गळ्यात भगव्या मफलरी आणि उपरणे होते. या मोर्चात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. या आंदोलकांनी आधी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकांना अभिवादन केलं. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली.
पोलिसांकडून धरपकड
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या परिसरात पोलीस व्हॅनही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर वर्षा निवासस्थानीही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहीद तुकाराम ओंबळे यांना अभिवादन केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शहीद स्मारकापासून 150 मीटरच्या अंतरावर हा मोर्चा जाताच पोलिसांनी मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू केली. मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना व्हॅनमध्ये टाकण्यात आलं. महिला आंदोलकांनाही अटक करण्यात आली आहे. यावेळी आंदोलक जोरजोरात घोषणा देत होते.
न्याय हक्कासाठी आलोय
आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकार त्यांचं काम करत आहे. आम्ही आमचं काम करत आहोत, असं या आंदोलकांनी सांगितलं.
जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी असहमत
दरम्यान, या आंदोलनातील मागण्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये प्रचंड तफावत आहे. या आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या याच मागणीला आंदोलकांनी पाठिंबा दिलेला नाहीये. आंदोलकांच्या मागण्या वेगळ्या आणि स्वतंत्र आहेत. मराठा म्हणूनच आरक्षण द्या आणि कायद्यात टिकणारं आरक्षण द्या, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे.