नवी मुंबई | 26 जानेवरी 2024 : मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा लाखोंचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. नवी मुंबईतील वाशी येथे मनोज जरांगे यांचा भव्य मोर्चा दाखल झालाय. मनोज जरांगे यांचा हा भव्य मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाला तर राज्य सरकारपुढे अडचणी वाढू शकतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे पाटील यांची वाशी येथे जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळाने जरांगे यांना राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दाखवला. या नव्या जीआरमध्ये सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. मनोज जरांगे यांनी जीआर वाचून मराठा समाजाच्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते लाखो मराठा बांधवांच्या समोर आले. त्यांनी सर्वांसमोर सरकारचा जीआर वाचून दाखवला. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
“शासनाच्या वतीने चर्चा झाली. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांसाठी आपण इथे आलो होतो. अधिकारी सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले आहेत. आपली भूमिका काय ते मी तुमच्यासमोर सर्वांना सांगतो, 54 लाख मराठ्यांच्या नोंदी खरंच सापडल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, ती नेमकी कोणाची तर ग्रामपंचायतींना माहिती द्या. त्यांनी असं सांगितलं की, काही जणांनी अर्ज केलं नाही त्यामुळे त्यांना दिलं नाही. पण त्याला नोंदी मिळाल्याची माहितीच नसेल तर तो अर्ज कसा करणार? गावागावात ग्रामपंचायतींमध्ये शिबिर राबवा. ठिक आहे 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना ओबीसी आरक्षण मिळतील. ज्या नोंदी मिळाल्या त्यांच्या सर्व परिवाराला आरक्षण मिळणार आहे. एका नोंदीवर 5 जणांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठा समाजाला फायदा होईल. वंशावळांना शंभर टक्के मिळणार”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरु आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे, ती सुद्धा आपली जबाबदारी आहे. आपल्याला नोंदी शोधण्यासाठी समाज म्हणून मदत करायची आहे. आपण अर्जच केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळणार? आपल्या भावाला प्रमाणपत्र मिळाला तर आपण तातडीने अर्ज करा. आपण त्यांना 4 दिवसातच प्रमाणपत्र वाटप करण्याचं सांगितलं होतं. आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. 54 लाख नोंदींच्या जागेवर, हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगत आहे, 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत. त्यांनी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरीत केलं आहे. मला यादी दिली आहे, मी यादी घेऊन बोलतोय. मी बिगर यादीचा त्यांना सोडत नसतो. त्यांनी त्याचंही पत्र दिलं आहे. आपलं म्हणणं आहे की बाकीचे का राहिले? ते इतरांना लगेच देत आहेत. ज्या लोकांना मिळाले त्यांची माहितीदेखील आपण मागितली आहे की नेमके दिलेत कुणाला? हे आम्ही अंतरवली असतो तर तेव्हाच सांगितलं असतो, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज करा”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“शिंदे समिती रद्द करायची नाही. या समितीने नोंदी शोधत राहावं, अशी आपली मागणी आहे. त्यांनी दोन महिने मुदत वाढवली आहे. टप्प्याटप्प्याने वाढवणार आहे”, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. “ज्यांची नोंद मिळाली त्याच्या गणगोतांनाही सगेसोयरेंच्या आधारावर आरक्षण पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्याच्या अध्यादेशाशिवाय आम्ही ऐकणार आहे. अध्यादेश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 54 लाख नोंदी आणि त्यांचे सगेसोयरे यांना आरक्षण द्यायचं असेल ज्यांच्याकडे नोंद नाही, त्यांनी शपथपत्र द्यायचं की हा माझा सोयरा आहे, त्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्रावर लगेच दिलं तर तुम्ही त्याची चौकशी करा, तो खोटा पाहुणा असला तर देऊ नका. पण शपथपत्र घेताना शंभर रुपये घेतले तर आमचे पैसे किती जाणार, पेपर मोफत करा. त्यांना हा म्हटलं आहे”, असं जरांगे पाटील म्हणाले.