मुंबई: खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांच्या उपोषणाला दीड महिना पूर्ण होऊनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्याने संतप्त झालेल्या मराठा विद्यार्थ्यांनी थेट मंत्रालयातच (mantralaya) आंदोलन केलं. मराठा विद्यार्थ्यांनी (maratha student) सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत जोरजोरात घोषणाबाजी केली. यावेळी मराठा विद्यार्थी प्रचंड संतप्त झाले होते. झुकेंगे नही म्हणणाऱ्या आजींना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ आहे. पण आमच्या मागण्या सोडवण्यासाठी त्यांना वेळ नाही. आमच्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्याचं आश्वासन दिलं. ते हवेतच आहे. संभाजी राजेंनी 14 मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्याही मान्य झाल्या नाहीत. हे सरकार सुस्तावलेलं आहे. आमच्या प्रश्नांवर चालढकल करत आहेत. नुसतं खेळवायचं काम सुरू आहे, असं सांगत या आंदोलकांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. जोपर्यंत आमचे प्रश्न सोडवले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी हे आंदोलन केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आज तडक मंत्रालयात धाव घेतली आणि सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं. या विद्यार्थ्यानी जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण मंत्रालय दणाणून सोडलं. आमचे प्रश्न अद्याप सुटले नाही. त्यामुळे आम्ही मंत्रालयात आलो आहोत. आमच्या काही अतिरिक्त मागण्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात. संभाजीराजेंना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत एवढ्याच आमच्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.
काही जातीय अधिकारी जाणीपूर्वक चालढकल करत आहेत. नियुक्त्यांबाबतचं ओपिनियन तोंडी मागवलं. पटवालीयांनीही त्यांना तोंडी उत्तर दिलं. नियुक्त्या करता येणार नाही म्हणून सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे अधिकारी अधिकार धुडकावत आहेत. जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ आणली जात आहे. एक म्हातारी म्हणते झुकेंगे नही. तिकडे मुख्यमंत्री जातात. इकडे चार चार हजार विद्यार्थ्यांच्या नियुक्तया रखडल्या. त्यासाठी पाहायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.
खासदार संभाजीराजेंनी उपोषण करून दीड महिने झाले आहेत. पण प्रश्न सोडवला जात नाही. सारथीचा प्रश्न तसाच आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न तसाच आहे. संभाजीराजेंनी 14 मागण्या केल्या होत्या. त्याची पूर्तता झाली नाही. फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना खेळवायचं काम सुरू आहे, असा संताप या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.