Maratha Reservation : साहेब… आता कुण्या नेत्याच्या… चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी त्याने स्वत:ला संपवलं
जालन्यातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी स्वत:ला संपवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन केलं आहे. तसेच संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार असल्याचंही म्हटलं आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : राज्य सरकारला देण्यात आलेली मराठा आरक्षणाची डेडलाईन संपत आलेली असतानाच मराठा आरक्षणासाठी एका व्यक्तीने स्वत:ला संपवलं. सुनील कावळे असं या व्यक्तीचं नाव आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काल रात्री त्याने जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात आरक्षणाविषयीची तगमग आणि तळमळ व्यक्त केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे.
सुनील कावळे असं या व्यक्तीचं नाव आहे. वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाजवळ काल रात्री 1 वाजून 30 मिनिटाने त्याने गळफास लावून जीवन संपवलं. त्यानंतर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात आणण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तर त्याचे कुटुंबीय सायन रुग्णालयात येण्यासाठी निघाले आहेत. मृत्यूपूर्वी सुनीलने एक चिठ्ठी लिहिली होती. ही चार पानी चिठ्ठी त्याने मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून लिहिली आहे. या चिठ्ठीत त्याने आरक्षणासाठीची वेदना आणि तळमळ व्यक्त केली आहे.
सुनील कावळे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होते. आरक्षण हाच विषय त्यांच्या डोक्यात सतत असायचा. ते जालन्याला मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी दोन दिवस आधीच आले होते. सुनील हे मूळचे जालन्याचे रहिवासी आहेत. अंबड तालुक्यातील चिकणगाव हे त्यांचं मूळ गाव. पण गेल्या 10 ते 15 वर्षापासून ते संभाजीनगरच्या राजनगरमधील मुकुंदवाडी परिसरात राहायला आले होते. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, बहीण, दोन पुतणे, भावजय असा परिवार आहे.
मी नसेल पण…
आपली परिस्थिती वाईट आहे. मुलाला म्हणायचे तुझा पॉलिटेक्निकला नंबरला लागला. पुढच्यावेळी इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल. तुला आरक्षण मिळेल. मी नसेल. पण आरक्षण मिळेल, असं ते मुलाला म्हणायचे असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
14 ऑक्टोबरपासून तणावात
सुनील हे 14 ऑक्टोबरपासून तणावात होते. मीच आरक्षण मिळून देईल असं त्यांचं म्हणणं होतं. दोन दिवसआधीच जरांगेच्या सभेसाठी ते जालन्याला गेले होते. काल परवा ते मुंबईला गेले. कामाला जायचं म्हणून गेले. जुन्या मालकाच्या गाडीवर कामाला जातो असं सांगून ते मुंबईला गेले. त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. 10 ते 15 वर्षापासून संभाजीनगरला स्थायिक झाले होते. ड्रायव्हर म्हणून ते काम करायचे, असं त्यांच्या जावयाने सांगितलं.
काय केलं पाहिजे म्हणजे…
सरकारला जाग आली पाहिजे. 48 पेक्षा अधिक तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. आज आणखी एकाने बलिदान केलं. काय नेमकं केलं म्हणजे यांना आमची वेदना कळेल? आमची भाषा कळेल? चार चार मुख्यमंत्री राज्यात येऊन गेले. क्षणाचाही विलंब न करता या घटनेची जबाबदारी घ्या. टिकणारं आरक्षण द्या. टाईम टेबल डिक्लेअर करून सांगा, अशी मागणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.
पत्रात काय म्हटलं?
महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. मी सुनील बाबुराव कावळे, मुं. पो. चिकणगाव, तालुका अंबड, जि. जालना एकच मिशन मराठा आरक्षण. एक मराठा लाख मराठा . साहेब… आता कुण्या नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर 24 हा आरक्षण दिवस. या मुंबईमध्ये. आता माघार नाही. कुणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देवू नका. त्यांचं नाव तोंडातून काढू नका. ऊठ मराठा जागा हो… पण लक्षात ठेवा शांततेत यायचंय. शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे.