मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठवाड्यात (Marathwada) तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत”, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
औरंगाबादमद्ये 24 जणांना वाचविण्यात यश आले. या महिन्यात 71 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर 26 जण जखमींची नोंद झाली आहे. 57 जनावरांचा मृत्यू, तर मोठी 196 जनावरे दगावली. 17 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान गुलाब चक्रीवादळ सोडून झाले. 81 टक्केच पंचनामे झाले आहेत. 22 लाख हेक्टर जमीन आणि शेतक-यांचे नुकसान झाले. प्रचंड असे नुकसान आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
रस्त्यांचे खूप मोठे नुकसान आहे. जमिनी खरडून गेल्या. मोठ्या प्रमाणात कोल्हापूर बंधारे फुटले. शेती पंप वाहून गेले. काही ठिकाणी 4 वेळा तर काही ठिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली.
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले.
राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.
1667 कच्ची घरे पडल्याची माहिती. 19 घरं पडल्याची माहिती. काल अनेक मंत्री मंत्रिमंडल बैठकीला उपस्थित नव्हते. ते आपआपल्या जिल्ह्यात होते, आपण पाहिले असेल अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहाणी केली होती. लातूर , बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबादचे पालकमंत्री तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा दौ-यावर जाणार, असे मला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले.
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत, असे निर्देश देखील त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा म्हणत शेतकऱ्यांनी खचून जावू नये, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.
संबंधित बातम्या
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द