महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘मविम’चा दुबईतील कंपन्यासोबत करार
या सामंजस्य कराराद्वारे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून कृषी मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून सुमारे 42,000 टन कृषी माल खरेदी होईल.
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे ‘मविम’ने एलबीआय जनरल ट्रेडिंग एलएलसी, बीबी ग्लोबल एफझेडई आणि सॅन बॅन बिझनेस कमर्शियल इन्व्हेस्टमेंट एलएलसी सोबत तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.
महिला आर्थिक विकास महामंडळने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. ‘मविम’ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी, महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
राज्यभरातील 50 हजार महिला शेतकऱ्यांना फायदा होईल
या सामंजस्य कराराद्वारे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून कृषी मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून सुमारे 42,000 टन कृषी माल खरेदी होईल. या भागीदारीमुळे कांदा, तांदूळ, ताजी फळे आणि भाजीपाला या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल. या सामंजस्य करारामुळे महिला शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेत आपला कृषी माल पोहोचण्यासाठी संधी मिळणार आहे. या तीन सामंजस्य करारांचे मूल्य जवळपास 60 ते 65 कोटी असण्याची अपेक्षा आहे, ज्याचा राज्यभरातील 50 हजार महिला शेतकऱ्यांना फायदा होईल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी ‘मविम’कडून काम केले जाते. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘मविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, यांनी या सामंजस्य कराराबाबत व्यक्त केली. ‘मविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यावेळी उपस्थित होत्या. (Mavim’s agreement with a Dubai-based company to market women’s products globally)
इतर बातम्या
महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, आनंदराज आंबेडकरांनी सरकारचे आवाहन धुडकावले
शाहरुख खानला टार्गेट केलं गेलं, ममता बॅनर्जींचं विधान; यूजर्स म्हणतात…