हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाला ‘चिवा’ नाव ठेवू, महापौर किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघांवर पलटवार
राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचं बारसं करण्यात आलं आहे. त्यांना इंग्रजी नावे देण्यात आल्याने त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर टीका केली आहे.
मुंबई: राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचं बारसं करण्यात आलं आहे. त्यांना इंग्रजी नावे देण्यात आल्याने त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर टीका केली आहे. तर हत्तीच्या पिल्लाचं चंपा आणि माकडाचं नाव चिवा ठेवू, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी, मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेऊ, आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेऊ, असं सांगतानाच केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा असा सल्लाही महापौरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
ऑस्कर पुरस्कार चालतो, मग नाव का नाही?
आमच्या मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्या ना, यांची नक्की पोटदुखी काय आहे? टीका करून फक्त चमकायच असतं, अशी टीकाही त्यांनी केली. तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो. मग ऑस्कर नाव का नाही? यांच्या टीकेला आता कधीच उत्तर देणार नाही, असं त्या म्हणाल्या.
गोव्याला प्रचारासाठी जाणार
माझं मूळ गाव आणि सासर गोवा आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मी आज गोव्यात जाणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केली अशी टीका करत आहेत. किमान विकासाची कामं करत आहोत हे विरोधक मान्य करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
कोटेचांनी अभ्यास करावा
यावेळी त्यांनी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या आरोपावरही उत्तर दिलं. मिहीर कोटेचा हे बिल्डर आहेत. नंतर आमदार झाले. याबाबत कोणाला आक्षेप नाही. निविदा देण्याची एक प्रक्रिया असते. केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे, कोटेचा यांनी अभ्यास करून घोटाळा काढावा. कारण नसताना आरोप करू नका, असा टोला त्यांनी लगावला.
कोटेंचाचा आरोप काय?
राणीच्या बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत 106 कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजपचे कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महापालिकेतील भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या: