एक राखी कोरोना योद्ध्यांसाठी, मुंबईच्या महापौरांचे अनोखे रक्षाबंधन
मुंबईचे रक्षणकर्ते असलेल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञ आहोत, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या उक्तीप्रमाणे मुंबईचे रक्षणकर्ते असलेल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञ आहोत, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. (Mayor Kishori Pednekar tied rakhi to Corona warriors in Mumbai)
रक्षाबंधननिमित्त महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार तसेच आग्रीपाडा पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात आज (22 ऑगस्ट) रक्षबंधन सणानिमित्त राखी बांधून मुंबईकरांच्या आरोग्यसेवेप्रती व सुरक्षेप्रती कृतज्ञता व्यक्त केली, त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.
याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार तसेच आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगांवकर उपस्थित होते. प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व फ्रंटलाईन अधिकारी-कर्मचाऱ्यांना राखी बांधून औक्षण केले. त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोरोनाची लाट आल्यानंतर मुंबईमध्ये सर्वप्रथम कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात आले. येथील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांचे प्राण वाचविले, याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद देते.
कोरोना काळात सर्व कर्मचाऱ्यांनी कुटुंब म्हणून काम केले
पेडणेकर म्हणाल्या की, रक्षाबंधन हा सण सर्व कुटुंबाला एकत्रित आणणारा सण आहे. कोरोना काळात रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केले आहे. यामध्ये स्त्री-पुरुष असा भेदाभेद न होता सर्वांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी या सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे, त्यांच्याप्रती कृतज्ञ होणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका
गत दिड वर्षापासून आपण अज्ञात शत्रूशी लढा देत आहोत. कोरानाच्या दोन्ही लाटेचा आपण यशस्वी मुकाबला केला आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली असून यामध्ये लहान मुलांना जास्त बाधा होऊ शकते, असे सांगितले आहे. ही लाट थोपविण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सज्ज असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबईकरांनी सहकार्य करावे
महापौर म्हणाल्या की, मुंबई हे आपले कुटुंब आहे. आपणच आपले रक्षणकर्ते असून महापालिकेचा चेहरा घेऊन जिथे जिथे पोहोचणे शक्य आहे तेथे – तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईकरांनी नियमांचे पालन करून बृहन्मुंबई महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी याप्रसंगी केले.
इतर बातम्या
नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले; आता विनायक राऊत म्हणतात, राणेंना ठोकम ठोकीची सवयच
(Mayor Kishori Pednekar tied rakhi to Corona warriors in Mumbai)