मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : मुंबई असो की पुणे या शहरांमध्ये घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु घराच्या किंमती आवाक्यात नसतात. आयुष्याची संपूर्ण पुंजी एकत्र करुनही घर घेता येत नाही. यामुळे मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच स्पप्न राहते. परंतु आता सामान्यांसाठी म्हाडा वाजवी किंमतीत घरे देत आहे. यासाठी म्हाडाच्या घरांची सोडत निघते. या सोडतीसाठी हजारो जण अर्ज करतात. मात्र, भाग्यवान व्यक्तीलाच घर मिळते. आता अशीच सोडत नुकतीच मुंबईत निघाली. त्यात आमदाराला घर मिळाले तर केंद्रीय मंत्री वेटींगवर राहिले.
जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे भाग्यवान ठरले आहे. त्यांचे मुंबई शहरात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अर्थात आमदाराला लागलेले हे घर आलिशान आहे. दक्षिण मुंबईमधील ताडदेव या भागात त्यांना हे घर लागले आहे. या भागात असलेल्या क्रिसेंट टॉवरमधील घरासाठी त्यांनी अर्ज भरला होता. त्यानंतर लॉटरीमध्ये त्यांना दीड हजार स्क्वेअर फुटाचे घर लागले आहे.
आमदार नारायण कुचे यांनी सर्वसाधारण अन् लोकप्रतिनिधी गटातून अर्ज भरला होता. त्यांनी क्रिसेंट टॉवरमधील घरासाठी दोन अर्ज केले होते. त्यातील एक अर्जात त्यांना हे घर लागले. लोकप्रतिनिधी या गटातून त्यांना हे घर मिळाले.
मुंबईतील हे घर आलिशान असल्यामुळे त्यांची किंमत तशीच असणार आहे. सुमारे दहा कोटी रुपये किंमतचे हे घर त्यांना लॉटरीमुळे 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपयांना मिळाले. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबई मंडळातील लॉटरीमध्ये लागलेले हे सर्वात महागडे घर आहे.
नारायण कुचे यांची राजकीय सुरुवात नगरसेवक म्हणून झाली. संभाजीनगरमधील मुकुंदवाडीचे ते नगरसेवक होते. त्यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. गेली दोन टर्म ते आमदार आहेत.
ताडदेवमधील घरासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनीही अर्ज केला होता. परंतु केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचा नंबर लॉटरीत लागला नाही. ते वेटींगवर राहिले.