Drugs Mafia Lalit Patil | ड्रग्ज तस्कर ललित पाटील, उद्धव ठाकरे आणि दादा भुसे यांचा एकत्रित फोटो व्हायरल
ललित पाटील याचे शिवसेना पक्षप्रवेशाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत ललित पाटील, दादा भुसे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलिसांना काही दिवसांपूर्वी 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. याच प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झालाय. त्याला पोलिसांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तो संधी साधून पळून गेला होता. याच प्रकरणी सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय. त्यांच्या आरोपांवर दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलंय. असं असताना आता नवे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी दादा भुसे यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता. दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, सर्व माहिती बाहेर येईल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांच्या आरोपांना दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलंय. जगभरातील कोणत्याही यंत्रणेकडून आपली चौकशी करा. माझ्या फोनचे कॉल रेकॉर्ड चेक करा. माझ्या आजूबाजूच्या लोकांचे फोन रेकॉर्ड करा. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. आरोप खोटे ठरले तर सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, असं दादा भुसे म्हणाले.
ललित पाटील याच्या शिवसेना प्रवेशाचे फोटो व्हायरल
दादा भुसे यांच्या स्पष्टीकरणानंतर आता ललित पाटील याचे शिवसेना पक्षप्रवेशाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत ललित पाटील आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे दिसत आहेत. या फोटोत दादा भुसे हे देखील दिसत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता हे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर दादा भुसे काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. पण त्यांनी दादा भुसे यांचं थेट नाव घेतलं नव्हतं. त्यांनी शिंदे गटाच्या एका नेत्याने ससून रुग्णालयाला फोन केला होता, असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे दादा भुसे यांनी नाना पटोले यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलाय.