मुंबई : विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ बोलण्यावरुन वाद नवा वाद निर्माण झालाय. सरकारने विधवा महिलांना गंगा भागिरथी असं बोलण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. पण राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर खुलासा केला आहे. विधवा ऐवजी गंगा भागिरथी असा शब्द वापरण्यााबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं. गंगा भागिरथीसह अनेक काही शब्द आपण विभागाला चर्चेसाठी पाठवले आहेत. पण याबाबतचा कोणताही निर्णय किंवा जीआर निघाला नसल्याचं स्पष्टीकरण मंगलप्रभात लोढा यांनी दिलं.
खरंतर विधवा महिलांना गंगा भागिरथी शब्द वापरण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून सरकारवर सडकून टीका केली जातेय. तसेच विरोधी पक्षाकडूनही या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे अखेर स्वत: मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
“विधवा महिलांच्या नावापुढे काय शब्द वापरावे याबाबत चर्चा होती. यामध्ये गंगा भागीरथी असा शब्दही सूचवण्यात आला होता. मी सर्व नावे विभागाकडे चर्चेसाठी पाठवले. पण याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अजून कुठलाही जीआर काढण्यात आलेला नाही. याबाबत काहीच निर्णय झाला नाही. एक पत्र आलं. ते पत्र फॉरवर्ड झालं. त्यामध्ये काय झालं? पूर्वीपण एक पत्र आलं होतं. तेही फॉरवर्ड केलं, आता हे पत्रसुद्धा फॉरवर्ड केलं”, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
“जी काही नावं आली आहेत ती नावं चर्चेसाठी पाठवली आहेत. याबाबत काही निर्णय झाला नाही. माझा पुढाकार नाही. महिला आयोगाने पुढाकार घेतला. त्यांनी चार नावं सूचवली आणि आणखी काही लोकांनी नावं सूचवली. तेच नावं मी विभागाला चर्चेसाठी पाठवली”, असं लोढा यांनी सांगितलं.
“महिलांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. त्यामध्ये या प्रश्नाचा काही संबंध नाही. हा प्रश्न देखील नाही. आमच्याकडे मंत्र्यांना काही पत्र पाठवली जातात. तसंच हे पत्र मी विभागाला पाठवलं. ते पत्र चर्चेसाठी पाठवलं आहे”, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
“तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारा. त्यांनी नाव बदलण्यास सांगितलं होतं. त्यांनी नावं सूचवली होती. हा माझा पुढाकार नाहीय. महिला आयोग आमच्या सरकारचा भाग आहेत. त्यांनी जे पत्र दिलं ते पत्र मी पाठवलं. आणखी काही संघटनांनी पत्र पाठवलं ते पत्र मी विभागात पाठवलं”, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.