पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापुरामुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांसाठी राज्य सरकार तातडीने मदत करणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापुरामुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीने मदत करणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मदितीची घोषणा केली.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
“कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे राज्यातील आठ पेक्षा जास्त ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या. यापैकी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळई गावाचं प्रचंड नुकसान झालं. अख्ख्या गावावरच दरड कोसळल्याने संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात 15 तर मिरगावात 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात अशा विविध घटनांमधून जवळपास 100 पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच कोल्हापूर, सांगलीत पुन्हा महापुराचं संकट ओढावलं आहे. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात तर महापुराचं प्रचंड भीषण रुप बघायला मिळालं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदतीची घोषणा केली. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता स्वत: सोमवारी (26 जुलै) पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राची पाहणी करणार आहेत. सर्व घटनांचा आढावा आल्यानंतर योग्य ती मदत जाहीर करु. पण त्याआधी आवश्यक ती तातडीची मदत करु, असं मुख्यमंत्री स्वत: म्हणाले आहेत.