बच्चू कडू वाटोळं करणार? पाहा नेमकं काय म्हणाले?
आमदार बच्चू कडू यांनी नाराजीच्या चर्चांवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत आल्याने शिवसेनेच्या काही आमदारांची गोची झाल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या चर्चांवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “मी नाराज होत नाही. नाराज झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही”, असं मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे अनेकांची गोची झाल्याचं देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.
“आम्ही शिंदे सरकारसोबत आहोत. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडलं. आता एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार हे माहीत नव्हतं. पण ते गेले”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. “आमची गोची व्हायचं कारण नाही. कारण आमचा स्वतंत्र पक्ष आहे. सगळ्यात मोठी उपलब्धी आहे की, दिव्यांग मंत्रालय सुरु झालं. एक मोठं काम झालं. देशातील पहिलं असं मंत्रालय झालं म्हणून गोची व्हायचं कारण नाही”, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
“काही गोष्टी नकारात्मक घडल्या असल्या तरी त्यातून सकारात्मक पाहायचं आहे. दिव्यांग मंत्रालय सुरु झालंय. यातच आमचा आनंद आहे. मी गेले 15 वर्ष दिव्यांगासाठी काम करतोय. माझ्याविरोधात 300 ते 350 गुन्हे दाखल झाले. हे सगळं करत असताना कित्येकदा जेलमध्ये गेलो. दिव्यांगासाठी 81 शासन निर्णय काढले. मी दिव्यांग मंत्रालयाचा अध्यक्ष आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘राष्ट्रवादीने आमचा घात केला’
“मी नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण मला या सरकारमध्ये दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लोकं मंत्रिपद मागत होते. आम्ही मंत्रालय केलं. याचे अनेक मंत्री होतील. यात नाराजीचं काही कारण नाही. पण एकंदरीत जे वातावरण चाललंय, राष्ट्रवादीने आमचा घात केला”, असं बच्चू कडू म्हणाले.
“राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून नवीन गट तयार केला. आता राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्याने आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे, तो आम्ही बोलून दाखवला आहे. त्यांची मोठी गोची झाली आहे. आमदारांना आपण सांगत होतो की, राष्ट्रवादीने आम्हाला निधी दिला नाही, कमी करण्याचा प्रयत्न केला. तीच राष्ट्रवादी आता सरकारमध्ये आहे. तीच अडचण निर्माण होतेय. आणि नाराजीचा सूर आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
“अजित पवार यांचं अभिनंदनच करावं लागेल. त्यांचं स्वागत आहे. एकनाथ शिंदे असल्यामुळे अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव होणार नाही. कारण आमचे मुख्यमंत्री मजबूत आहेत. संघर्ष होणार नाही”, असं मत बच्चू कडू यांनी मांडलं.