Bachchu Kadu | ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर…’, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींची कदाचित आपण कल्पनादेखील करु शकणार नाही, इतक्या घडामोडी इथे घडत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडींमुळे महाराष्ट्राची जनता अवाक होतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारलं तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी मुख्यमंपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण तीनही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी एकत्रिपणे बैठका घेत योग्य समन्वय साधला होता. त्यानंतर आता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी घडामोडी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे.
‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर…’
या दरम्यान, बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर भाजपकडून परिणाम भोगावे लागतील”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. “लोकांचे प्लॅन वाढले तर भाजपचे कोणतेच प्लॅन कामी येणार नाहीत”, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. दुसरीकडे “एकनाथ शिंदे 2024 ला मुख्यमंत्री राहतील का याबाबत आता सांगता येणार नाही. पण तेच मुख्यमंत्री राहावेत, असं माझं मत आहे”, असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला. त्यावर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं. “असं होऊ शकत नाही. कारण असं केलं तर भाजपला त्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल. आपण एकनाथ शिंदे यांना बाहेर काढलं, उद्या मुख्यमंत्री बदलले तर शिंदे यांचेही पाच-दहा टक्के मतं आहेत. ते सुद्धा नाराज होतील. त्यामुळे नाराजीच्या सुरात असणाऱ्यांची टक्केवारी वाढली तर तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत”, अशी स्पष्ट प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.