एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरले?
ST Worker : एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात पावले उचलली गेली आहेत. त्यामुळे या मागण्यांचे नवीन परिपत्रक लवकर निघणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलीय.
सुनील जाधव, मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत आमदार पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अन् प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. तसेच राजकीय प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच सकारात्मक बातमी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून मिळाले आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.
काय झाली चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून परिपत्रक त्यातील अटी शिथिल केल्या नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर करावा, संप दरम्यान गैरहजर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित करावी, या मागण्यांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या एमडीला योग्य सूचना दिल्या. त्यांनी काही दिवसांत परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांच्यांवर काय
पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांचे राज्यभर मोठं काम आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सर्व राजकीय नेते अन् लाखो सहकारी येतात. त्यामुळे त्यांचा हा मेळावा राजकीय दृष्टीने पाहू नये. तसेच पंकजाताई यांच्या बाबतीत कोणीही चुकीच्या स्टेटमेंट करू नये, त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत, त्यामुळे इतर पक्षाचे लोक ज्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे चुकीचं काम कोणी करू नये, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला काही घेणे-देणे नाही
महाविकास आघाडीला राज्याच्या लोकांचं काही घेणं देणं नाही ते राज्यातल्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर बोलत नाही. राज्यातील सत्ता गेल्याने त्यांना वैफल्य आले आहे, त्यामुळे हे रोज महाविकास आघाडीमध्येही एकमेकांवर टीका करतात. यामुळे लोकांनी या महाविकास आघाडीकडे बघायचं ऐकायचं सुद्धा नाकारलेला आहे.
संजय राऊत काय बोलले, अजित पवार काय बोलले, काँग्रेसचे नेते काय बोलले, याकडे लोक जास्त सिरियसली बघत नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.