पक्या दादा, तू कुठलं पार्सल आहेस?; सुषमा अंधारे यांचा शिंदे गटाच्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल
राज्यपाल कोश्यारी बोलले तेव्हा यातील एकही बोलला नाही. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करणे ही भाजपची खेळी आहे. खरंच महाराष्ट्राचा सन्मान ठेवायचा असेल तर राज्यपालांचा राजीनामा नव्हे तर हकालपट्टी केली असती.
विजय गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर सडकून टीका केली आहे. प्रकाश सुर्वे हा माझा भाऊ आहे. पण पक्या दादा, तू कुठलं पार्सल आहेस? राष्ट्रवादीने तुला उचलून आपटलं. तिकडे गुलाल लागला नाही. शिवसेनेत आले आणि गुलाल लागला, असं सांगतानाच अरे दादा, घमंड तो अक्सर पहाडों का तुटता है. शंभुराजे और प्रकाश सुर्वे क्या चीज है? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
मागाठाणे मतदारसंघात काल सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राज्यातील शिंदे सरकारने सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे. सत्तेचा किती गैरवापर करावा? आमच्या बाळकृष्ण बिदवर कारवाई केली. शिंगाडे ताईंची तिच अवस्था, त्यांच्यावर कारवाई केली.
अभिषेक मिश्रावर कारवाई केली. शिवसेनेचा आवज बुलंद करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शाखाप्रमुख संदिप शेलारवर कारवाई केली. अरे दादा, किती जणांवर कारवाई करणार? चार-दोन लोकांवर कारवाई केली म्हणजे आदित्य ठाकरेंचा आवाज दाबू शकाल का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
तरीही किती घमंड?
काल शंभुराजे देसाईंच्या मतदारसंघात होते. शेळीनं उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये अशी आमच्या गावाकडे म्हण आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं वरळीत येऊन निवडणूक लढवून दाखवा. ते जमत नसेल तर आम्ही तुमच्या ठाण्यात येऊन निवडणूक लढवून दाखवतो, असंही आव्हान दिलं.
आता चाललंय दोन माणसांचं बोलणं. आता शंभुराज देसाईंची बोलण्याची काही गरज होती का? ज्या पाटणमध्ये 2004 पर्यंत त्या पठ्ठ्याला गुलाल लागला नाही. 2004 ला शिवसेनेनं तिकीट दिलं आणि गुलाल लागला. 2009 ला त्याला परत आपटला. 2014 ला पुन्हा निवडून आले. तरीही किती घमंड? अरे दादा, घमंड तो अक्सर पहाडों का तुटता है, शंभुराजे और प्रकाश सुर्वे क्या चिज है?, असा टोला अंधारे यांनी लगावला.
जित्याची खोड जात नाही
40 जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तुमचा पाया शिवसेनेने उभा केला आहे. आम्ही तुम्हाला उभं केलंय. तेव्हा तुम्हाला पाडूही शकतो. मला वाटलं इथे पका भाऊच असले, पण तिकडे आमचे रामदास कदम… बाप आणि लेकरू लय रडलं, एवढे कुठं रडायचं असतं का?
संजय कदमांनी तुम्हाला जेरीस आणलं होतं हे रामदास कदमांना लक्षात आलं पाहिजे. आम्ही शेवटी तरस खावून विधानपरिषद याच शिवसेनेनं तुम्हाला दिली. पण जित्याची खोड कधी जात नाही, अशी टीका त्यांनी केली.
दरेकर म्हणजे लय अवघड कार्यक्रम
प्रवीण दरेकर म्हणजे लय अवघड कार्यक्रम आहे. मुंबई बँकेतील घोटाळा केला. गरिबांना टॉयलेट. वर ऑफिस दरेकरांचं. खाली संस्थेला जागा वर ऑफिस दरेकरांचं. किरीटभाऊ दरेकरांच्या बाबतीत बोलत नाही.
दरेकर कुठं कष्ट करायला गेले तेव्हा एवढी प्रॉपर्टी केली? बराशा खांदायला कुठं गेले होते? मतदार गरीब आहेत आणि गरीब ठेवलेत, मतदारांना काय मिळणार आहे? चोर चोर मौसेरे भाई सगळे एकत्र जमतात, अशी टीकाही त्यांनी केली.
शिंदेंनी जमू दिले तर…
राज्यपाल कोश्यारी बोलले तेव्हा यातील एकही बोलला नाही. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करणे ही भाजपची खेळी आहे. खरंच महाराष्ट्राचा सन्मान ठेवायचा असेल तर राज्यपालांचा राजीनामा नव्हे तर हकालपट्टी केली असती, असं सांगतानाच एकनाथ शिंदे यांनी जमू दिले तर तुम्ही पंतप्रधान व्हा. येणाऱ्या काळात मोदींना सुद्धा देवेंद्र फडणवीस आव्हान देतील, असा टोलाही त्यांनी लगावला.