Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | काय, अजित दादांच्या मुख्यमंत्रिपदाची योग्यवेळ?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. याशिवाय 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तीन वेळा सत्तांतर होऊन गेलं आहे. राज्याने गेल्या चार वर्षात तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. असं असताना आता वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : आमदार रामराजे निंबाळकर स्पष्ट बोलले की, आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना योग्यवेळी मुख्यमंत्री करु. पण भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी कंन्फ्यूजन क्रियेट केलंय. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतचाही भाजप आवडत नाही. देशाची सेवा करणारा भाजप आवडतो, असं मुनगंटीवार म्हणालेत. आता याचा अर्थ नेमका काय? शिंदे आणि अजित दादांना सोबत घेतल्याचं मुनगंटीवारांना आवडलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
आता या वक्तव्यावरुन पुढच्या काही तासांत सुधीर मुनगंटीवारांचंच स्पष्टीकरण येईल किंवा बावनकुळेही बोलतील. दुसरीकडे रामराजे निंबाळकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांना आज ना उद्या योग्यवेळी मुख्यमंत्री करणार असं रामराजे निंबाळकर म्हणाले आहेत. ज्या पद्धतीनं पवारांना पंतप्रधान करण्याचं स्वप्नं घेऊन 1999ला त्यांना साथ दिली. तशीच साथ आता अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी देत असल्याचं निंबाळकर म्हणाले.
अजित दादांशिवाय दुसरा नेता नाही, असं रामराजे निंबाळकर म्हणतायत. म्हणजेच, सध्या पवार काका-पुतण्यांमध्ये अजित पवारांमध्येच पुढच्या राजकारणाची क्षमता आहे, हेच सुचवण्याचा प्रयत्न निंबाळकरांचा आहे. असं ते बोलूनही दाखवतायत. स्वत: अजित पवारांनीही, वयाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निवृत्तीचा सल्लाही दिला होता. पण तो सल्ला पवारांनी आपल्या स्टाईलनं धुडकावून लावला.
विजय वडेट्टीवार यांचाही दावा
अजित दादा नाही..तर, शरद पवारांचे वर्गमित्र कोरोनाची लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटच्या सायरस पुनावालांनीही पवारांना निवृत्तीचा सल्ला दिला. रामराजे निंबाळकर आता बोलले. पण 8 दिवसांआधी विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी दावा केला होता की, शरद पवारांना सोबत आणा तोपर्यंत मुख्यमंत्री करणार नाही, असं मोदींनीच दादांना सांगितलंय. मात्र अजित पवारांनीही स्पष्ट केलंय की, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आपला डोळा नाही.
दीड महिन्यांआधी, राष्ट्रवादीतून अजित पवार आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत आले. तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगल्यात. मात्र, फडणवीसांनी स्पष्ट केलंय की, दादांना सोबत घेतानाच सांगितलंय की मुख्यमंत्री बदलणार नाही. तर शिंदेच मुख्यमंत्री राहतील. 2019 पासून महाराष्ट्रात तीनदा सत्तांतर झालंय आणि 3 मुख्यमंत्री मिळालेत म्हणजे, महाराष्ट्रातलं राजकारण पाहता, आणखी काय काय होतं हे दिसेलच.