शिंदेंच्या ‘धनुष्यबाणा’चा पुन्हा राजकीय वार, मोठ्या आदिवासी नेत्याची ठाकरेंना पाठ, बड्या आमदाराचा पक्षप्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात आज नंदुरबारमधील बडे नेते आमश्या पाडवी यांनी प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. पण त्यांनी आज शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय.
मुंबई | 17 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात आज नंदुरबारमधील बडे नेते आमश्या पाडवी यांनी प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारल्यानंतर आमश्या पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. पण अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. आमश्या पाडवी यांच्या रुपाने शिंदे गटात एक आदिवासी नेत्याचा चेहरा पक्षाला मिळाला आहे. आमश्या पाडवी यांच्यासह नंदुरबारमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील आज शिंदे गटाच प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे आणि मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.
आमश्या पाडवी यांच्या राजकीय प्रवास हा 1995 पासून सुरु झाला. त्यांनी 1995 पासून नंदुरबारमध्ये स्थानिक राजकारणाला सुरुवात केली. त्यांची दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यांनी अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपदही भुषवलं. त्यांनी 11 वर्षांपासून समाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक मोर्चे काढले आहेत.
आमश्या पाडवी यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. आमश्या पाडवी यांचा दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर 2022 ला आमश्या पाडवी यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ कमी झालं आहे. याआधी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
ठाकरेंच्या जवळच्या आमदाराचा नुकताच पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची एकही संधी एकनाथ शिंदे सोडताना दिसत नाहीयत. नुकतंच गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे नेते रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचं पक्षप्रवेशावेळी सांगितलं. तर दुसरीकडे वायकर यांच्यामागे ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागला होता. वायकर यांची अनेकदा चौकशीदेखील झाली. वायकर यांनी या चौकशीवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. पण लगेच काही दिवसांनी वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.