रात्र वैऱ्याची, दगाफटक्याचा धसका, मुख्यमंत्री रात्रभर ताज लँड हॉटेलमध्ये मुक्कामाला, प्रत्येक पक्षात हालचाली
विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला दगाफटक्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात सध्याच्या घडीला जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रात्री ताज लँड हॉटेलमध्येच मुक्काम राहणार आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अभूतपूर्व हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीने 9 वा उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार बनली आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला दगाफटक्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात सध्याच्या घडीला जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रात्री ताज लँड हॉटेलमध्येच मुक्काम राहणार आहे. या हॉटेलमध्ये कालपासून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा मुक्काम आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे देखील आज आपल्या सर्व आमदारांसोबत या हॉटेलमध्ये आज मुक्कामी राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी या हॉटेलमध्ये एक रूम बुक करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी इथूनच विधान भवनात निघणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ललित हॉटेलमध्ये बैठक सुरु आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, यासोबतच मतांचा कोटा याबाबत बैठकीत चर्चा सुरू आहे. काही आमदार हे वाहतूक कोंडीत अडकले असल्यामुळे बैठकीला हजर नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपच्या गोटात काय सुरु?
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
काँग्रेसच्या गोटात काय सुरु?
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून आपल्या आमदारांसाठी व्हिप बजावण्यात आला आहे. या व्हिपमध्ये सर्वांना मतदान करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच पक्षाने दिलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आदेश या व्हिपमध्ये देण्यात आला आहे. यानंतर काँग्रेसची विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकही आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडत आहे.
ठाकरे गटाच्या गोटात काय सुरु?
महाविकास आघाडीच्या बैठकीतली मोठी बातमी मिळत आहे. काँग्रेसच्या बैठकीला आज ठाकरे गटाचे विनायक राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातील काही मतं ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मिळावी यासाठी आज चर्चा होणार आहे. कोटा पूर्ण होवून राहिलेली मत ठाकरे गटाला द्या, अशी विनंती ठाकरे गटाचे नेते करणार आहेत.