अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी मोठी अपडेट, उपसभापतींच्या दालनात प्रचंड खलबतं, नेमका निर्णय काय?
अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्याबाबत सातत्याने बैठका पार पडल्या. दानवेंच्या निलंबनाचा निर्णय मागे घेण्याबाबतच्या विचारावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी तीन वाजता पुन्हा बैठक पार पडली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात यासाठी बैठक पार पडली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. यानंतर प्रसाद लाड यांच्याकडूनही त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करण्यात आली होती. संबंधित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्यावर 5 दिवसांसाठी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर अंबादास दानवे यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवत दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात येऊ शकते असा अंदाज आहे. विशेष म्हणजे दानवे यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात यावी का? याबाबत चर्चा करण्यासाठी आज महत्त्वाची बैठका पार पडल्या. पण या बैठकांमधून आज कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानवेंवरील कारवाई मागे घेण्याबाबतचा निर्णय आता उद्याच होणार आहे.
अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्याबाबत सातत्याने बैठका पार पडल्या. दानवेंच्या निलंबनाचा निर्णय मागे घेण्याबाबतच्या विचारावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी तीन वाजता पुन्हा बैठक पार पडली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते. पण या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. याउलट उद्या याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
या दरम्यान,अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. “माझ्यावर सभापतींनी कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक काही बोलणार नाही”, असं अंबादास दानवे म्हणाले. तसेच निलंबन मागे घेतल्यानंतर त्यावर बोलणं योग्य असेल, असं म्हणत दानवे यांनी या विषयावर जास्त प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणावर निषेध व्यक्त करण्याचा ठराव मांडण्यात यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशीदेखील मागणी केली. त्यावर अंबादास दानवे यांनी संबंधित विषय हा लोकसभेच्या सभागृहातला आहे, त्याची इथे चर्चा होणं अपेक्षित नाही, असं अंबादास दानवे बोलत होते. यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंबादास दानवे वैतागले. त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी जागेवरुन बाजूला होत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यांना प्रसाद लाड यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं. पण याच प्रकरणावरुन अंबादास दानवे यांच्यावर उपसभापतींनी 5 दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली आहे.