BIG News : भर सभागृहात शिवीगाळ करणं भोवलं, अंबादास दानवे यांच्यावर अखेर मोठी कारवाई
"याच भाषेत बोलायला लागले तर बाकीच्या महिलांना काम करणं अवघड होईल. परत आपण हे करणारच असं म्हणणं हे पाहता कुठल्या प्रकारची ही संस्कृती रुजवली जात आहे? त्यांच्या नेत्यांनीदेखील विचार केला पाहिजे की, महिलांना असुरक्षित वाटेल, असं वातावरण केलं जात आहे. म्हणून अत्यंत दु:खद अंतकरणाने आम्ही हा निर्णय घेतोय", अशी भावना नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन सुरु असताना सोमवारी (1 जुलै) विधीमंडळात मोठा गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. तसेच राहुल गांधी यांच्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. यामध्ये आमदार प्रसाद लाड आणि भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. यावेळी अंबादास दानवे यांनी लोकसभेत झालेल्या घडामोडींवर विधान परिषदेत चर्चा करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अंबादास दानवे यांना विरोध केला. यामुळे वैतागलेल्या दानवेंनी भर सभागृहात आपल्या जागेवरुन बाजूला होत आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी प्रसाद लाड यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत शिवीगाळ केली.
या घटनेचा पडसाद आजही विधान परिषदेच्या सभागृहात बघायला मिळाला. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांनी निलंबनावर चर्चेची मागणी केली. पण सत्ताधाऱ्यांनी त्यास विरोध केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: तिथे उपस्थित होते. त्यांनीदेखील निलंबनानंतर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलं. यावेळी सभापतींनीदेखील तिच भूमिका घेतली. तर विरोधकांनी गोंधळ घातला. सभापती हाय हाय, अशी घोषणाबाजी विरोधकांकडून यावेळी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज विधान परिषदेत उपस्थित होते. त्यांनीदेखील अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाईवर भूमिका मांडली. “अशाप्रकारे ज्यावेळी ठराव मांडला गेला त्यावर चर्चा झाली नाही. हा ठराव चर्चेचा ठराव नसतो. या ठरावावर आपण मतदान घेतो. त्यानुसार आपण मतदान घेतलेलं आहे. जी कारवाई नियमानुसार व्हायला हवी ती कारवाई नियमानुसार झालेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा जो आग्रह होता तो चुकीचा होता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सभापती नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
“आमची आज गटनेत्यांसोबतही चर्चा झाली होती. खरंतर गटनेत्यांसोबत झालेली चर्चा इथे मांडली नसती. पण कुणाला संधी दिली नाही, असा विचार लोकांमध्ये जाऊ नये त्या दृष्टीकोनातून आम्ही काही लोकांवर जबाबदारी टाकली होती. पण त्यासंदर्भात कुठलाही पुनर्विचार किंवा आपण जे केलं ते अयोग्य आहे, अशी कुठलीही भावना त्यांच्या वर्तनामधून दिसून आलेली नाही. ते गटनेत्याच्या बैठकीतही अनुपस्थितच होते. तसेच कालही सभागृहात दोन्ही जे प्रसंग झाले, सकाळच्या वेळेला क्रिकेटचा ठराव आल्यावर त्याला अंतिम स्वरुप न दिलेलं असताना एकदम एकमेकांवर धावून जाणे, कुणालाच बोलू न देणं, हा प्रकार होऊन माझ्यावरतीच पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
“दुसरीकडे काल दुपारी जो प्रकार घडला तो अतिशय क्लेशदारी होता. अशावेळेला महिला उपसभापति आहे, महिला प्रतिनिधी आहे, महिला प्रतिनिधीसमोर एक लोकप्रतिनिधी अशी भाषा करायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या महापौरांसमोर प्रत्येक जण अशा भाषेत बोलेल. याच भाषेत बोलायला लागले तर बाकीच्या महिलांना काम करणं अवघड होईल. परत आपण हे करणारच असं म्हणणं हे पाहता कुठल्या प्रकारची ही संस्कृती रुजवली जात आहे? त्यांच्या नेत्यांनीदेखील विचार केला पाहिजे की, महिलांना असुरक्षित वाटेल, असं वातावरण केलं जात आहे. म्हणून अत्यंत दु:खद अंतकरणाने आम्ही हा निर्णय घेतोय”, अशी भावना नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
“पाच दिवसांचं निलंबन करायचं की काय करायचं, याबद्दल आम्ही निर्णय घेतला. तसेच अंतिम आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता यावं म्हणून आम्ही मध्यममार्गी असा मार्ग काढलेला आहे. मला बाकीच्या सभासदांना देखील सूचना करायची आहे की, एखाद्याला बोलायला मिळालं नाही तर सभागृहात किती वेळ शिल्लक आहे याचा विचार केला पाहिजे. ज्या घटना घडतात त्याचं लोकांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. विरोधी पक्षांनी आमची भूमिका समजून घ्यावीत. अत्यंत न्यायं, योग्य आणि उचित कारवाईचा प्रस्ताव आपण मांडलेला आहे”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
अंबादास दानवे काय म्हणाले?
“राजीनामाच्या मागणी करणं हे त्यांचं काम असतं. त्याने काही फरक पडत नाही. त्यांना जे काही करायचे ते करु द्या. भाजपने नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भाजपने राहुल गांधींना संसदेतून निलंबित केलं होतं, १५० खासदारांना निलंबित केले होते. त्यांनी संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे मला किंवा उद्धव ठाकरेंना शिकवण्याची गरज नाही. त्यांनी सभापतींकडे जाऊन माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, कोर्टात जावं. त्यांना कायदे आणि नियमांची आता जाणीव झाली आहे आणि ते चांगलं आहे. मी शिवसैनिक आहे आणि त्याप्रमाणे मी ते उत्तर दिले. मी त्यांच्यासारखा पळपुटा नाही. मी बोललो आहे आणि ते मला मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.