मनसेच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी; मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत जोरदार फिल्डिंग
पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक राजकीय पक्षांनी तर मतदारसंघांचा आढावाही घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात मनसेनेही...
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे संसदेत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या आघाड्याही उभ्या राहताना दिसत आहेत. तर काहींना स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्यापैकी मनसे एक आहे. मनसेनेही स्वबळावर लढायचं ठरवलं असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. इतकच नव्हे तर मनसेच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादीही जोरदार व्हायरल झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेने मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत आणि ठाण्यापासून कोकण आणि विदर्भापर्यंतच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवार देण्यावर मनसेचा भर आहे. त्यासाठी मनसेने विद्यमान आमदारांसह माजी आमदारांनाही लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या लोकसभेच्या 10 संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल होत आहे. या यादीतील उमेदवारांनाच मनसेने निवडणुकीचं तिकीट दिल्यास त्या त्या मतदारसंघात तगडी लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहे.
कोण आहेत यादीतील उमेदवार
मनसेच्या लोकसभेच्या या संभाव्य यादीत एकूण 10 जणांचा समावेश आहे. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून राजू पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. कल्याण- डोंबिवली मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे राजू पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यांची लढत थेट श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे. राजू पाटील हे कल्याण-डोंबिवली परिसरातील लोकप्रिय आमदार आहेत. त्यामुळे ते काय चमत्कार घडवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाण्यातून अभिजीत पानसे किंवा अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी अभिजीत पानसे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज ठाकरे पानसे यांनाच उमेदवारी देणार की जाधव यांना याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पुण्यातून वसंत मोरे, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर आणि संभाजीनगरमधून प्रकाश महाजन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुरस वाढण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
मनसेचे संभाव्य उमेदवार
कल्याण लोकसभा – राजू पाटील
ठाणे लोकसभा – अभिजित पानसे/ अविनाश जाधव
पुणे लोकसभा – वसंतराव मोरे
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनीताई ठाकरे
दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर
संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन
सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
चंद्रपूर लोकसभा – राजू उंबरकर
रायगड लोकसभा – वैभव खेडेकर
निर्णय राज ठाकरेच घेणार
मीडियातून व्हायरल झालेल्या या यादीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माध्यमात आलेल्या बातम्यांची विश्वासार्हता काय? लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. पण सर्व निर्णय राज ठाकरे घेतात. आमची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी ताकत आहे. राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून लोक मनसेचा खासदार निवडून देतील, असा विश्वास प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
कोरड्या विहिरीत उड्या मारू
माझं वय 70 वर्षे आहे. पक्षाने तरुण नेत्याला संधी दिली तर चांगलं होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. राज ठाकरे यांनी सांगितल्यास आम्ही कोरड्या विहिरीत उड्या मारू शकतो, असंही महाजन म्हणाले.