’10 टक्के आरक्षण म्हणजे तुम्ही नेमकं काय दिलं?’; राज ठाकरे यांचा थेट सरकारलाच सवाल
विधानसभेत मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा आज मंजूर झाला आहे. पण या आरक्षणावर विरोधकांकडून सवाल उपस्थितत केले जात आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत.
मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. कारण विधानसभेत आज मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेलं हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “मराठा समाजाने जागृत राहावं. हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरु आहे. तामिळनाडूत एक प्रकरण झालं होतं की, राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं आणि त्या प्रकरणाची केस अजून सुप्रीम कोर्टात सुरु आहे. याच्यापुढे काही झालं नाही. राज्य सरकारला मुळात याबाबतचे अधिकार आहेत का? ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे. मी याआधीदेखील सांगितलंय की, हा खूप तांत्रिक विषय आहे. याबाबत नुकतंच सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद व्यक्त करण्यासारखं नाही. हे नक्की काय आहे ते एकदा मराठा समाजाने त्यांना विचारावं”, असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले.
“10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय दिलं? कशात 10 टक्के आरक्षण दिलं? तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार. मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय. आम्ही काही करु शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहेत का?”, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
‘एका जातीसाठी असं करता येत नाही’
“मुळात राज्य सरकारला याबाबतचे अधिकार आहेत का? देशात इतकी राज्ये आहेत, अनेक राज्याराज्यांमध्ये अनेक जाती आहेत. असं एका राज्यात एका जातीसाठी असं करता येत नाही. समाजाने या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले. “मला काही कळत नाही की हे सर्व काय सुरु आहे. मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत. आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि दुष्काळ, पाण्याचा विषय एवढा मोठा आहे. पण याकडे कुणाचं लक्षच नाही. निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षण याच गोष्टींकडे आमचं सगळ्यांचं लक्ष वळवायचं आणि मूळ विषयांकडे दुर्लक्ष करायचं. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या राज्यात काही चालू आहे का? तसं काहीच नाही”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.