राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणार?
केंद्र सरकारकडून आज तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दोन दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच गोष्टीचा धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची मागणी केली आहे. केंद्र सरकारने तीन दिग्गजांना आज भारतरत्न पुरस्कार घोषित केला आहे. यामध्ये माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. यानंतर आता राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. “माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता”, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
“पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल”, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024
संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे”, असं संजय राऊत म्हणाले. “खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात. मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केले. निवडणुकांची धामधूम. दुसरे काय?”, अशी टीका राऊतांनी केली.
“कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग, पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्नने सन्मानित केले. आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला, ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.