‘चल उद्धव, बास झालं आता’, राज ठाकरे यांची साद भावाने ऐकलीच नाही?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही दोन भावंड एकत्र येतील का? असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी एकत्र यावं, असा सल्ला अनेकांकडून दिला जातो. विशेष म्हणजे त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून प्रयत्नही करण्यात आले, असा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी स्वत: केलाय.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘झी मराठी’च्या खुपते तिथे गुपते या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत प्रत्येक मराठी माणसाने बघावी अशी आहे. या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांना एक भावनिक डॉक्यूमेंट्री दाखवली. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांचे अगदी तरुणपणातले फोटोपासून वेगवेगळे फोटो होते. दोन्ही भावंडांचे शिवसेना पक्षात काम करतानाचे काही क्षणचित्र होते, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे काही फोटो होते. या फोटोंच्या मागे एक अतिशय भावूक करणारं गाणं होतं जे त्या भावंडांचं नातं आणि दोस्ती अधोरेखित करत होतं.
ती डॉक्यूमेंट्री पाहून राज ठाकरे थोडे भावूक झाले. त्यांनी चेहऱ्यावर आतल्या भावना उमटू दिल्या नाहीत. पण त्या क्षणासाठी त्यांची बॉडीलँग्वेज बरंच काही बोलत होती. त्यानंतर त्यांनी काही वाक्यांमध्ये उत्तरंही दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकासाठी या मुलाखतीतला तो क्षण फार अमूल्य असा आहे.
मुलाखतीतलं संभाषण जसंच्या तसं
राज ठाकरे – खूप छान दिवस होते ते. माहित नाही मला, कुणीतरी विष कालवलं. किंवा नजर लागली. असो…
अवधूत – ते दिवस परत येऊ शकत नाही का?
राज ठाकरे – माहिती नाहीओ. विषय हा फक्त राजकीय नव्हता ना? आमच्या मनात काय, यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात काय, हे राजकारण खूप घाणेरडं असतं. दुर्देव! अजून काय?
अवधूत – तुमच्यातपण एक वाघ आहे. एवढं सगळं झालेलं असताना उद्धव यांना बरं नसताना गाडी काढली, मीडियाचा विचार न करता स्टेअरिंगवर बसले…
राज – मीडियाचा का विचार करायचा? मी कुणाचाही विचार करत नाही. मला ज्यावेळेला एखादी गोष्ट वाटते ती गोष्ट मी त्यावेळेला करतो. ती गोष्ट करत असताना मला कोणी थांबवू शकत नाही.
अवधूत – असंच गाडी काढून जा आणि हक्काने सांगाना, चल उद्धव, बास झालं आता,
राज – तुम्हाला काय वाटतं? हे झालं नसेल? जाऊदे!
अवधूत – जाऊदे म्हणजे…. आम्ही हिंतचिंतक आहोत
राज – हो, आम्हाला पण माहिती आहे
अवधूत – आम्ही तुमच्या दोघांचेच नव्हे महाराष्ट्राचे हितचिंतक आहोत.
राज – मला कल्पना आहे. बघू, नियतीच्या मनात उद्या काही असेल समजा…
अवधूत – त्यासाठी आम्ही सगळे गणपती पाण्यात ठेवायला तयार आहोत.
राज – हो… बघू
अवधूत – परवा, मुलाखतीत तुमच्या आईंना विचारलं की, उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? त्या म्हणाल्या, फार वाईट वाटलं. तुम्हाला?
राज – वाईट वाटलं, हा भाऊ म्हणून भाव झाला. पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं लक्ष असायला पाहिजे होतं. इतकं सरळपणे, भाबडेपणे असेल किंवा तुमचं दुर्लक्ष असेल तर 40 लोकं तुमच्या हाताखालून निघून जातात हे सतर्क असलेल्या माणसाचं लक्षन नव्हे.
अवधूत – बरोबर आहे, पण तुम्ही ज्या हक्काने इतकं ठोकून सांगताय, असंच ठोकून सांगणारा एक भाऊ बाजूला नाही ना आता!
राज – नाही आता पवार साहेब बाजूला असताना, मी कशाला पाहिजे? इतकी हक्काची माणसं आता आजूबाजूला आहेत. बघू…
अवधूत – बघू म्हणजे आम्ही वाट बघतोय आणि स्पष्टच सांगतोय की आम्ही वाट बघतोय…