मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. आज सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी आणि मुलासह देशपांडे यांच्या भेटीसाठी पोहोचले. राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी संदीप देशपांडे यांची रुग्णालयात जावून भेटच घेतली नाही तर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या गाडीतून घरी रवाना केले. संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा राज ठाकरे यांच्या पत्नी देखील त्यांची विचारपूस करताना दिसत होत्या. यावेळी राज ठाकरे हे मागेच थांबले होते. राज ठाकरे यांनी मागे थांबून आधी संदीप देशपांडे यांना पुढे रवाना केले. ( Attack On Sandeep Deshpande )
कठीण काळात राज ठाकरे हे नेहमी आपल्या लोकांच्या मागे उभे असतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे हे स्वत: गाडी चालवून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना मातोश्री पर्यंत सोडायला गेले होते. ही घटना देखील महाराष्ट्र कधी विसरु शकणार नाही.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्याची बातमी कळताच राज ठाकरे यांच्यासह अनेक मनसेचे नेते आणि कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले होते. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी देखील रुग्णालयात जावून संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मनसे नेत्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागचा सूत्रधार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) संदीप देशपांडे यांचा जबाब नोंदवला असून हल्लेखोरांना पकडण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे.
संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या अतिशय जवळचे नेते मानले जातात. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हापासून संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. विद्यार्थी सेनेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. 2012 मध्ये संदीप देशपांडे मनसेचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत ( BMC ) निवडून आले होते.