‘तुम्हाला आऊटपूटशी मतलब आहे ना?’, घराणेशाहीच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका
राजकारणात घराणेशाहीवरुन अनेक पक्षांना विरोधी पक्षांकडून टार्गेट केलं जातं. घराणेशाहीचा आरोप करत टीका केली जाते. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपलं स्पष्ट मत मांडलं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांना यावेळी घराणेशाही विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “मधल्या काळात सत्तांतर झालं, ज्याप्रकारे शिंदे सरकार आलं, ज्याप्रकारे आमदार इतक्या मोठ्या संख्येने बाहेर पडलं आणि सत्तांतर झालं, त्या गोष्टीकडे बऱ्याच लोकांनी म्हटलं की, घराणेशाहीच्या तावडीतून लोकशाही सोडवली असं काही लोकांचं म्हणणं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला. नंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राजीनामा मागे घेतला. या दोन गोष्टी बघितल्या तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही राहावी, टीकावी, यापुढे असं काही घडू नये, यासाठी तुमचा काय विचार आहे?”, असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांना विचारला.
“घराणेशाही किंवा लोकशाही यापेक्षा हाताळलं कसं जातंय? ते महत्त्वाचं आहे. लोकांचे प्रश्न सुटताहेत की नाहीत, लोकशाहीमधून एखादा माणूस आला आणि तो काम करत नसेल तर तुम्ही काय म्हणाल? आणि घराणेशाहीतून एखादा माणूस आला आणि तो जर काम करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला आऊटपूटशी मतलब आहे ना?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
“छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आले. तुम्ही याला घराणेशाही म्हणणार? ती व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून ती छत्रपती झाली. मला वाटतं, छत्रपतींचं कर्तृत्व महाराष्ट्राला दिसलेलं आणि कळलेलं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
“लोकशाहीतून आली काय, घराणेशाहीतून आली काय, चालवतंय कोण कसं ते महत्त्वाचं आहे. पंडीत जवारलाल नेहरु यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी ज्या क्षमतेने देश चालवला ती गोष्ट वाखणण्यासारखी आहे. त्यांच्या काही गोष्टी अनेकांना आवडल्या नसतील, काही गोष्टी आवडल्या असतील”, असंही राज ठाकरे म्हणाले.
“व्यक्तीशी निगडीत आहे, आज भाजप पक्ष आहे की नरेंद्र मोदी? त्याआधी भाजप पक्ष होता की अटलबिहारी वाजपेयी? लोकं मतदान व्यक्तीकडे बघूनच करतात ना? घराणेशाही असं नसतं. माणूस ती गोष्ट हातळतोय कशी त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लोकशाहीमधील अपयशही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे हीच गोष्टी बरोबर आणि हीच गोष्ट चुकीचं असं ठरवता येणार नाही. शाया महत्त्वाच्या नाहीत तर व्यक्ती महत्त्वाचा आहे”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.