मुंबई: मनसे नेते राज ठाकरे (raj thackeray) हे येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याची मनसेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज ठाकरे यांनी या दौऱ्याच्या संदर्भाने काही सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. खुद्द मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मीडियाशी संवाद साधताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच हा दौरा कसा असेल याची माहितीही दिली आहे. आम्ही 5 जून रोजी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहोत. त्यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. अजूनही जाऊन पाहणी करणार आहोत. हा दौरा ईव्हेंट नसेल. आम्ही रामलल्लाचं दर्शन घ्यायला जात आहोत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. नांदगावकर यांनी हा दौरा म्हणजे ईव्हेंट नाही असं सांगितलं असलं तरी राज यांचा हा दौरा हायटेक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
येत्या 5 जूनला अयोध्येला जाणार आहोत. त्याचं प्लानिंग सुरू आहे. कसं जाणार? कधी जाणार याची यावेळी चर्चा करण्यात आली. त्याबाबत सूचना केल्या आहेत. 5 जूनचा दौरा कसा करावा? तिथे गेल्यावर काय करायचं त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही अयोध्येत रेकी करून आलो आहोत. अजूनही अयोध्याला जाऊन पाहणी करणार आहोत. कशा प्रकारे काय करायचं ते पाहू. एकदा जाऊन आलो पुन्हा जाणार आहोत. आमचा अयोध्या दौरा हा इव्हेंट नाही. दर्शन आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे उपलब्ध व्हाव्यात म्हणून नितीन सरदेसाईंकडे जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानेवेंना त्यांनी पत्र दिलं आहे. आम्ही दानवेंच्या संपर्कात आहोत, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी गृहमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. सुरक्षेबाबतचं हे पत्र आता जाईलच. सरकारच्या बैठका सुरू आहेत. सरकार काय निर्णय घेतं. त्यावर ठरवू. वाय प्लस सुरक्षा होती. झेड सुरक्षा करण्याची मागणी केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Nana Patole on BJP : स्वतः जुमलेबाज असणारे इतरांची काय पोलखोल करणार; नाना पटोलेंचा भाजपवर आसूड