राज ठाकरे आज मोठी घोषणा करणार? सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं, पडद्यामागे काय घडतंय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांचं सह्याद्री अतिथीगृहावर जाणं हे सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अचानक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. जवळपास दोन ते तीन दिवस याबाबत प्रचंड चर्चा चालल्या. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. पण त्यानंतरही भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, गजानन काळे हे नेते सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, या मागणीसाठी राज ठाकरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत.
राज ठाकरे मोठा निर्णय जाहीर करणार?
मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पराभव करायचा असेल तर भाजपला मनसेची गरज लागू शकते. भाजपची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी युती आहे. पण तरीही ठाकरे गटाचा पराभव करण्यासाठी ठाकरे कुटुंबाचे सदस्य म्हणून राज ठाकरे यांचा भाजपला काही प्रमाणात मदत होऊ शकते. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेचे संबंध दृढ होताना दिसले आहेत. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय भाजप नेते नारायण राणे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले होते. त्यामुळे आजच्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत.
विशेष म्हणजे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी अचानक पुण्याला गेले होते. ते पुण्याच्या पक्ष कार्यालयात अचानक दाखल झाले होते. त्यामुळे पुण्यातील मनसे नेत्यांची चांगलीच धावपळ झालेली बघायला मिळाली होती. पुण्यात राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडलेली. त्यानंतर मनसे नेते बाबू वागस्कर यांनी मोठं विधान केलेलं. राज ठाकरे पुढच्या चार-पाच दिवसात मुंबईतून मोठी घोषणा करतील, असं स्पष्ट विधान बाबू वागस्कर यांनी केलं होतं.
राज ठाकरे यांच्या भेटीमागील आणखी काही कारणं
राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागील अनेक कारणं सांगितली जात आहेत. राज ठाकरे बीडीडी चाळीच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेलं नुकसान, तसेच सिडको सोडत धारकांचं शिष्टमंडळ 8000 मराठी कुटुंबाच्या घराच्या प्रश्नासाठी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.