‘लवकरच सत्तेत येणार, आपण सत्तेपासून दूर नाही’, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला हुंकार
"मी नुसती आशा दाखवत नाही. मला हे माहिती आहे. महापालिका जिंकायच्या आहेत. कधी निवडणूक होईल माहीत नाही. गेली २ वर्ष दहावीला नापास झाल्यासारखं वाटायला लागलंय", असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : “पक्ष चालवताना त्रास होतो. प्रत्येक पक्षाला त्रास होतो. आज भाजप सत्तेवर दिसतो, पण त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. 1952 साली जनसंघ हा पक्ष स्थापन झाला, त्यावेळी कॉंग्रेस सोडून दुसरं काहीच नव्हतं. तीन वेळा अटलजी आले. परत काँग्रेस बोकांडी बसली. 2014 ला बहुमत हाती आलं. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल”, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेची लवकरच सत्ता येईल, असं वक्तव्य करत कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न केला.
“मी नुसती आशा दाखवत नाही. मला हे माहिती आहे. महापालिका जिंकायच्या आहेत. कधी निवडणूक होईल माहीत नाही. गेली २ वर्ष दहावीला नापास झाल्यासारखं वाटायला लागलंय. मार्च-ऑक्टोबर, मार्च-ऑक्टोबर… कधीही निवडणुका होऊदेत. महापालिकेत आपण सत्तेत असणार म्हणजे असणार”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आता जे काही सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. इतकं घाण, गलिच्छ राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो हाच आहे का? किती खालच्या पातळीला जाऊन बोलावं याची काही मर्यादाच उरलेली नाही. हल्ली बातमी नसतेच, फक्त हा काहीतरी बोलला, तो काहीतरी बोलला”, असं राज ठाकरे म्हणाले.
“22 तारखेला गुढीपाडव्याची सभा आहे. सायंकाळी ‘शिवतीर्था’वर यावं हे आपल्या सर्वांना आमंत्रण. मला जे काही बोलायचं आहे कुणाला फाडायचं आहे, वाभाडे काढायचे आहेत, ते मी 22 तारखेला काढीन”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. “यांच्या रोजच्या तमाशांना जनता विटलेली आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. महापुरुषांचे पुतळे उभारून काही होत नाही. जयंत्या, पुण्यतिथी या पलीकडे काही हाती लागणार नाही. ते काय करून गेले, बोलून गेले याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांचा भाजपला इशारा
विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी भाजपला देखील इशारा दिला. “भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती या गोष्टी होतातच. भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालूय, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान, “या सगळ्या कालखंडात पुढे जात असताना आजच्या परिस्थितीत आमचा राजू पाटील बघा. पक्षाची बाजू विधानसभेत एकटे मांडत आहेत. शोले चित्रपटात बोलत नाही का, एकही है मगर काफी है. संपूर्ण विधानसभा भरली तर यांचं काय होईल? पण हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार केला जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.