राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून महापौरांना पिंजऱ्यात डांबलं!
मुंबई : मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान आता जिजामाता उद्यानात हलवले जाणार आहे. हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांवर आपल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात महापौर विश्वनाथ महाडेश्वर चक्क पिंजऱ्यात बंदिस्त दिसत आहेत. राज ठाकरेंनी आज ट्विटर आणि फेसबुकवर हे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे […]
मुंबई : मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान आता जिजामाता उद्यानात हलवले जाणार आहे. हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांवर आपल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात महापौर विश्वनाथ महाडेश्वर चक्क पिंजऱ्यात बंदिस्त दिसत आहेत. राज ठाकरेंनी आज ट्विटर आणि फेसबुकवर हे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नियोजित स्मारक मुंबईच्या महापौरांच्या सध्याच्या निवासस्थानी बांधले जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान जिजामाता उद्यानात हलवले जाणार आहे. हाच धागा राज ठाकरेंनी पकडला आहे.
“मूळ महापौरांच्या निवासस्थान सोडून मुंबईच्या महापौरांना जिजामाता उद्यान (मुंबईचे प्राणीसंग्रहालय) येथे घर देण्यात आले आहे.” या बातमीचा दाखल देत राज ठाकरेंनी जिजामाता उद्यान व्यंगचित्रात दाखवले आहे. शिवाय, प्राण्यांचे तीन-चार पिंजरे दाखवले आहेत. अस्वल, हरीण यांच्यासोबत एका पिंजऱ्यात मुंबईचे महापौर दाखवण्यात आले आहे.
उद्यानात प्राणी पाहायला आलेला चिमुरडा पिंजऱ्यातील प्राण्यांना खायला अन्न टाकत असतो. त्याचवेळी आई चिमुरड्याला म्हणते, “बाळा, त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!”
राज ठाकरे यांनी दिवाळीच्या दरम्यान जवळपास रोज एक व्यंगचित्र रेखाटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर राज ठाकरे नेहमीच फटकारे ओढत असतात. मात्र, आज त्यांनी मुंबईच्या महापौरांवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्राचीही नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण हे व्यंगचित्र शेअर करत आहेत.
#MayorinZoo #BMC #Shivsena pic.twitter.com/KELaurcLaW
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2018