‘प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील’, राज ठाकरे यांचं मनोज जरांगे यांना भावनिक पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र पाठवत उपोषण मागे घेण्याची कळकळीची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रातून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलीय. "भूलथापा मारणारे, 'तो मी नव्हेच' म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे", असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.
मुंबई | 31 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. “इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
‘ही माणसं फार निष्ठुर’
“तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू”, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
“ह्यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला”, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?
“अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही.”
“जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.”
“आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार.”
“आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.”
“भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे.”
“जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासनं कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मत मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या, आम्ही सत्तेवर येताच तात्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवलं कि, कोण तुम्ही? कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उध्दटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरं संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत.”
“मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा.”
“तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा.”
“ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत रहातात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक” असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू.”
“पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”. शुभेच्छा आणि पुन्हा एकदा, जय महाराष्ट्र!”