Deepostav 2023 | ‘…तर, मग गुजराती ऐवजी तुम्ही’, सलीम-जावेदवरुन मनसेचं भाजपाला सडेतोड प्रत्युत्तर
Deepostav 2023 | मनसेने भाजपाला सरळ सांगितलं. मनसेने सलीम-जावेद जोडीला दीपोत्सव 2023 बोलावलं, त्यावरुन राजकारण सुरु झालय. मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आता भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने Deepostav 2023 च आयोजन केलं आहे. गुरुवारी शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सव 2023 च उद्घाटन झालं. यावेळी मनसेने बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी सलीम-जावेद यांना बोलावलं होतं. त्यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सव 2023 च उद्घाटन झालं. सलीम-जावेद जोडीने 70-80 चं दशक गाजवलं. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे डायलॉग लिहिले आहेत. आता मनसेने सलीम-जावेद जोडीला दीपोत्सव 2023 बोलावलं, त्यावरुन राजकारण सुरु झालय. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कार्याक्रमात बोलताना यावरुन टीका केली. “काल एका दीपोत्सवाच उद्घाटन झालं. आदरपूर्वक नाव घ्यायच झालं, तर सलीम खान-जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यांनी त्यांची टिमकी वाजवून घेतली. ते मोठे असतील, आहेत, पण आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची कल्पना आहे” असं आशिष शेलार म्हणाले.
मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आता भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांचं मराठी प्रेम म्हणजे पुतना मावशीचं. मराठी बद्दल एवढं प्रेम असेल, तर गुजराती पंतप्रधानांऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. एवढं बोलायची देखील हिम्मत दाखवतील का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. “मराठी कलाकारांवर अन्याय होतो, तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभे राहतं? व कोण पळतं हे महाराष्ट्राला माहीत आहे” असं संदीप देशपांडे म्हणाले.
‘आशिष शेलारांच्या पोटात दु:खू लागलं’
मनसेचे दुसरे नेते यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा शेलारांवर टीका केलीय. “मागची 11 वर्ष सातत्याने दीपोत्सव होतोय. दीपोत्सवाला मराठी कलाकारांची झाडून हजेरी असते. यावेळी सलीम-जावेद यांना बोलावल म्हणून आशिष शेलारांच्या पोटात दु:खू लागलं. त्यांनी नको त्या गोष्टींच राजकारण करु नये. त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका” असं यशवंत किल्लेदार म्हणाले.