MNS Protest against Toll | मी अरेस्ट होणार नाही, ही लोकशाही, आम्ही जनजागृती करतोय : अविनाश जाधव
मनसे पक्ष पुन्हा एकदा टोलच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालाय. मनसे कार्यकर्ते पनवेल, मुलुंड टोलनाक्यावर दाखल होवून टोन न भरता गाड्या सोडत आहेत. त्यामुळे पोलिसांना मुलुंड टोलनाक्यावर दाखल व्हावं लागलं. यावेळी अविनाश जाधव यांनी भूमिका मांडली.
मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा टोलनाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक झालीय. मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव आज मुलुंड टोलनाक्यावर दाखल झाले. त्यांनी टोलशिवाय काही वाहने सोडण्यास सुरुवात केली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अविनाश जाधव यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण अविनाश जाधव ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केला जातोय, असं अविनाश जाधव म्हणाले.
अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याआधी अविनाश जाधव यांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली. “मला सांगा, काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खोटे बोलले का? त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला? मी गाडी अडवून आंदोलन करत नाहीय. मी जनजागृती करत आहे. मला जनजागृती करण्याचा अधिकार आहे. मी आज अरेस्ट होणार नाही. तुम्ही मला उचलून न्या”, असं अविनाश जाधव पोलिसांना म्हणाले.
“आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. याच्याव्यतिरिक्त काही नाही. आम्ही चार लोकं आहोत. त्यामुळे आम्ही बाकीच्या गोष्टींमध्येही बसत नाही. मी आज अरेस्टच होणार नाही. ते कायद्यात बसतच नाही. त्यांना मला अटक करायची असेल तर त्यांनी आधी मला नोटीस द्यावी. मग मला अटक करावी”, असं अविनाश जाधव म्हणाले. यानंतर पोलिसांनी अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
राज ठाकरे यांची टोलविरोधात पत्रकार परिषद
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध नेत्यांचे व्हिडीओ दाखवून त्यांच्या टोल विषयीच्या भूमिका सांगितल्या. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याचा हवाला दिला. तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना टोल नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर मनसैनिक पनवेल आणि मुलुंड टोल नाक्यावर एकत्र जमले. त्यांच्याकडून तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना टोल न भरता सोडलं जात आहे.