राज ठाकरेंना ‘तेव्हा’ विरोध करणं आता बृजभूषण सिंह यांना महागात पडणार? मनसेचं चित्रा वाघ यांनाही आव्हान
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंहांविरोधात मनसेही आक्रमक झालीय. बृजभूषण सिंहाचा भाजपनं राजीनामा घ्यावा, अशी मागणी मनसे नेत्याने केलीय.
मुंबई : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर नामवंत महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. दोन दिवस होऊनही यावर भाजप नेत्या चित्रा वाघ आणि भाजप गप्प का? असा प्रश्न मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी विचारलाय. त्याबरोबरच प्रकाश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय.
भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंहांविरोधात पैलवानांनी मोर्चा उघडलाय. बृजभूषण सिंह आणि प्रशिक्षकावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. तब्बल २०० हून जास्त पैलवान दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करतायत. कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगाटनं सुद्धा आंदोलनस्थळी भेट देऊन कारवाईची मागणी केलीय. जोपर्यंत बृजभूषण सिंहावर कारवाई होत नाही. तोपर्यंत देशातला एकही पैलवान कुस्ती खेळणार नसल्याचा इशारा बजरंग पुनियानं दिलाय. दरम्यान इकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंहांविरोधात मनसेही आक्रमक झालीय. बृजभूषण सिंहाचा भाजपनं राजीनामा घ्यावा, आणि यावर आता शरद पवार, सुप्रिया सुळेंसह संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मनसे नेते प्रकाश महाजनांनी केलीय.
काही दिवसांपूर्वीच बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी मुख्य पाहुणे होते. महाराष्ट्र भाजपनं त्यांना आमंत्रण देऊन सन्मानितही केलं. पण अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंहांविरोधातच शड्डू ठोकल्यामुळे केंद्र सरकार काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं आहे.