मुंबई | 17 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं समीकरण कधी जुळेल याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील, अशी आशा अनेकांकडून सातत्याने व्यक्त केली जाते. पण ही आशा वास्तव्यात साकारली जाणं फार कठीण आहे, असंच दिसतंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मैत्री होऊ शकली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात बंड पुकारुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सत्ता स्थापन करु शकले. त्यामुळे राजकारणातील उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न पुन्हा मराठी जनतेकडून उपस्थित केला जातो. पण तसं होणं सध्या तरी कठीण दिसतंय. कारण दोन्ही भावांमध्ये टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. यावेळी तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे अतिशय कठीण परिस्थितीतून झुंजत आहेत. या परिस्थितीवरुन शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन प्रकरणावरुन पाठराखण केली होती. काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसले होते. पण त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसे विक्रोळी महोत्सवात शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “ज्यांच्यामुळे दिग्गज सेनेतून बाहेर, त्यांच्या हातून पक्ष गेला”, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.
“एका वाक्यात सांगायचं झालं तर आज एक सर्कल पूर्ण झालंय. शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच्याच हातातून पक्ष सुटला”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.