मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट रुग्णाला न कळवता थेट मुंबई महापालिकेला देण्यात यावा, असा नवा आदेश मुंबई महापालिकेने सर्व कोरोना टेस्टिंग करणाऱ्या लॅबला दिला आहे (MNS Nitin Sardesai). या निर्णयावर मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी रुग्णाला आपला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आला आहे? हे कळवण्यात यायला हवं, अशी मागणी केली आहे (MNS Nitin Sardesai).
“आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळणं हा रुग्णाचा हक्क आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट त्याला न कळवता लॅबमधून थेट मुंबई महापालिकेकडे गेला, दोन दिवस महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही, या दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर त्याची जबाबादारी मुंबई महापालिकेची राहील”, असं नितीन सरदेसाई म्हणाले.
“मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काढलेला नवा आदेश अत्यंत चुकीचा आहे. या आदेशानुसार, रुग्णाने कोणत्याही लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली, तर या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाला त्याबाबत माहिती न देता थेट मुंबई महापालिकेला माहिती देण्यात येईल. त्यानंतर महापालिका प्रशासन उपाययोजना करेल. पण कुठल्याही रुग्णाला आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की नेगेटिव्ह आला, हे कळण्याचा अधिकार नाही का?”, असा सवाल नितीन सरदेसाई यांनी केला.
“गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात तक्रारी येत आहेत. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर अनेक तास रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका येत नाही. दिवसभर रुग्णाला बेड उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्यावर जर दोन-दोन दिवस महापालिकेकडून रुग्णाला कळवण्यात आलं नाही तर, त्या रुग्णाने काय करायचं?”, असा प्रश्न नितीन सरदेसाई यांनी उपस्थित केला.
“महापालिकेने जर रुग्णाची दखल घेतली नाही, दोन दिवसात रुग्णाची प्रकृती गंभीर झाली, त्याची जबाबदारी महापालिका घेईल का? त्यामुळे हा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. हा आदेश त्यांनी तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा, यापुढे रुग्णाला न कळवल्यास आणि वेळेवर उपचार न दिल्याने रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी महापालिकेची राहील”, असं नितीन सरदेसाई म्हणाले.