Video : जास्ती आरडाओरडा करू नका, माझा नातू आजारी आहे; राज ठाकरे यांनी उत्साही कार्यकर्त्यांना फटकारलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच शिवतीर्थावर कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे मनसे कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच असतो. वाढदिवसानिमित्ताने पोस्टरबाजी, विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोष करणं या सर्व गोष्टी ओघाने येतातच. काही कार्यकर्ते दरवर्षी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री 12 वाजता केक कापतात. यावेळी राज ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी करत जल्लोष करतात. राज ठाकरेही प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना भेटतात. त्यांची विचारपूस करतात. कार्यकर्त्यांच्या उत्साहात सहभागी होतात. काल मात्र या अतिउत्साही कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी प्रेमाने फटकारले. त्याला कारणही तसंच होतं.
राज ठाकरे यांनी काल रात्री उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल असंख्य मनसैनिक शिवतीर्थावर आले होते. मनसे सरचिटणीस नयन कदम आणि विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी काल रात्री राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. रात्री ठीक 12 वाजता राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
माझा नातू आजारी…
राज ठाकरे केक कापण्यासाठी आलेले असताना आणि त्यांनी केक कापल्यानंतर मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दणाणून गेला. रात्रीची निरव शांतता असल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणा दूरपर्यंत ऐकायला येत होत्या. यावेळी घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी प्रेमाने फटकारले. आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका. माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असं राज ठाकरे यांनी सुनावले. राज ठाकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर कार्यकर्तेही शांत झाले.
कार्यकर्त्यांची झुंबड
दरम्यान, राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. शिवतीर्थ या निवासस्थानाला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता राज्यभरातून कार्यकर्ते येणार असल्याने पोलिसांची सुरक्षा व्यवस्था, त्यासोबत खासगी सुरक्षा व्यवस्था शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेली आहे.
शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेरील रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आले आहेत आणि रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादरच्या सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. “भावी मुख्यमंत्री” असा उल्लेख असलेला बॅनर सुद्धा कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आलेला आहे.
राज ठाकरे यांचं आवाहन
राज यांनी ट्विटद्वारे वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आणि चहात्यांना आवाहन केलं आहे की, वाढदिवसाला शुभेच्छा देताना कोणीही मिठाई आणि पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये. त्या बदल्यात एक झाडाच रोपटं किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या. जेणेकरून झाडाचे रोपटं काही सामाजिक संस्थांना देण्यात येतील आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजूंसाठी करता येईल, असं आवाहन राज यांनी केलेल आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होतोय. परंतु राज यांच्या आवाहनाला मनसैनिकांकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे.