मुंबई – शिवसेनेच्या (Shivsena)शनिवारी झालेल्या सभेतील संजय राऊतांचा (Sanjay Raut)एक व्हिडीओ शेअर करत, भगवा नाक पुसायला ठेवला आहे का, असा सवाल मनसेचे (MNS)प्रवक्ते गजानन काळे यांनी विचारला आहे. मुंबईत बीकेसीत शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या विराट सभेनंतर शिवसेनेला भाजपा आणि मनसे नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येते आहे. शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे, किरिट सोमय्या यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेचं नाव न घेता, त्यांच्यावर वाट चुकलेले मुन्नाभाई अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेनेही शिवसेनेला लक्ष्य केले आहे. कालच्या सभेतील संजय राऊतांचा व्हिडीओ शेअर करत, भगवा हा नाक पुसायला ठेवलाय का, असा सवाल गजानन काळेंनी विचारला आहे.
भगवा नाक पुसायलाच ठेवलाय काय ??#मास्तरसभा pic.twitter.com/GDtDl7xoP1
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 15, 2022
काय आहे व्हिडीओत
मनसे नेते गजानन काळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत शिवसेना खासदार संजय राऊत दिसतायेत. संजय राऊत यांना शिंक आल्यानंतर, ते गळ्याभोवती असलेल्या भगव्या उपरण्याने आपले नाक पुसताना दिसतायेत. या व्हिडिओवर मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे, भगवा हा नाक पुसाय़ला ठेवला आहे का, असा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.
शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची तुलना, नाव न घेता सिनेमातील मुन्नाभाईशी केली होती. मुन्नाभाई प्रमाणे काही जणांना स्वताला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते, शाल घेऊन फिरतात म्हणे ते हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटाच्या शेवटी मुन्नाभाईला कळतं की आपल्या भेज्यात केमिकल लोचा झाला आहे. तरही केमिकल लोचाची केस आहे, असे अनेक मुन्नाभाई फिरतायेत तर फिरु द्या, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुखांना लगे रहो मुन्नाभाईंची डीव्हीडी पाठवणार असल्याची माहिती मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार–भूमिका आत्मसात करण्याची उद्धव ठाकरेंना गरज असल्याची टीकाही खोपकरांनी केली आहे. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात महात्मा गांधीचे विचार वाचून चित्रपटाचा नायक त्यांना आत्मसात करतो, त्याचप्रमाणे राज ठाकरे हे सुद्धा त्यांच्या बालपणापासून बाळासाहेब ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांनी त्यांचे विचार–भूमिका आत्मसात केल्या. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने आत्मसात करण्याची उद्धव ठाकरेंना गरज आहे, असा दावा खोपकरांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट बहुदा समजलेला नाही, त्यामुळे त्यांनी तो नीट समजून घ्यावा यासाठी आम्ही मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने चित्रपटाची डीव्हीडी पाठवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.