Dashing Raj Thackeray | हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल, स्पोर्ट्समन राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यांचा फोटो पाहून अनेकजण त्यांच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांचे खेळावर असलेलं प्रेम सगळ्यांना माहिती आहे. स्वतःला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत लॉन टेनिस खेळतानाचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांचा आणखी एक फोटो व्हायल होत आहे.
मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी ‘शिवाजी पार्क, दादर’ असं लिहिलं. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेकडो मनसैनिकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे निवांतपणे खुर्चीवर बसून चहा पितांना दिसत आहेत. त्यांचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकजण त्यांच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.
राज ठाकरे आपल्या अमोघ वक्तृत्वासाठी सतत चर्चेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लॉन टेनिस खेळण्याकरिता ते चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क जिमखान्यात लॉन टेनिस खेळाचा एकत्र आस्वाद लुटला होता. त्यांचे टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शिवाजी पार्कशेजारीच राज ठाकरे यांचं ‘कृष्णकुंज’ हे निवासस्थान आहे. शिवाजी पार्कमध्ये तसंच जिमखान्यात दररोज अनेक खेळाडू प्रामुख्याने क्रिकेट आणि टेनिसचा सराव करतात. राज ठाकरे यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून टेनिसचा सराव करण्याचं चांगलंच मनावर घेतलं आहे.
राजकारणात बुद्धिबळापासून ते क्रिकेटपर्यंत सगळ्याच खेळांचा कस लागतो. पण आता लॉन टेनिस या नव्या खेळाचा ‘राज’कारणात शिरकाव होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपल्या ‘बॅक हॅण्ड स्ट्रोक’मधून The ball is in your court असं तर सुचवत नसावेत ना…?
राज ठाकरे आणि टेनिस एल्बो
राज ठाकरे यांच्या उजव्या कोपराला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यांच्या हातावर मुंबईत उपचार करण्यात आले. त्यामुळे काही काळ राज ठाकरेंच्या हाताला बँडेजही दिसत होते. मात्र आता ‘बॅक हॅण्ड स्ट्रोक’ लगावणाऱ्या राज ठाकरेंना पाहून चाहत्यांनी निश्वास सोडला.
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावं लागलं होतं.
टेनिस एल्बो म्हणजे काय?
कोपरापासून दंडाच्या दिशेने जोडलेले स्नायू सुजले तर मनगट उचलण्यासाठी, किंवा हालचाल करण्यासाठी वेदनादायी ठरतं. मनगटाचा वापर होणारी साधी कामं करतानाही अडचणी येतात. टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखे खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यावरुनच या दुखापतीला टेनिस एल्बो म्हटलं जातं.
संबंधित बातमी :
Raj And Amit Thackeray Tennis | ‘राज’पुत्राचा एकत्र टेनिसचा डाव!