मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे येत्या 5 जून रोजी अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याची मनसेने (mns) जय्यत तयारी केली आहे. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांच्या वारंवार बैठका होत असून तयारीचा आढावा घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून किती कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. त्यासाठी किती ट्रेन लागणार आहेत. कोणत्या विभागातून किती गाड्या निघणार आहेत. स्त्री आणि पुरुष कार्यकर्ते किती असतील या सर्वांचा आढावा घेतला जात आहे. राज्यातून सुमारे १५ हजार मनसे सैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहेत. काही उत्तर भारतीय कार्यकर्तेही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या दौऱ्यापूर्वी 21 मे रोजी राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतरची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर बाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या 5 जून रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे. मुंबईतून अयोध्येला जाण्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मुंबईतील मनसेच्या प्रत्येक विभाग अध्यक्षाने रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. अयोध्येला येणाऱ्या लोकांची शाखानिहाय नोंदणी सुरू आहे. मुंबईत मनसेचे एकूण ३६ विभाग अध्यक्ष आहेत हे सर्वजण अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत, अशी माहिती मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली.
मुंबईतून मनसेच्या अयोध्येला चार ट्रेन जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिक येथून मनसेच्या सहा ट्रेन अयोध्येला जाणार आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू आहे. आतापर्यंत एकूण 12 ट्रेनचे मनसेने बुकिंग केले आहे. तर काही पदाधिकारी बायरोड अयोध्येला येणार आहेत. 5 जून पूर्वीच हे पदाधिकारी अयोध्येत दाखल होणार आहेत. मुंबईतून बोरिवली विभागातून 100 गाड्या अयोध्येला जाणार आहेत. मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागातून अशाच पद्धतीने गाड्या जाणार आहेत, अशी माहिती यशवंत किल्लेदार यांनी दिली.
मुंबईतून जवळपास 15 हजार मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. या मध्ये मनसेच्या दाव्या नुसार मुंबईतील अनेक उत्तर भारतीयही अयोध्या दौऱ्याला येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या 15 जून रोजी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे राज यांचा दौरा भव्यदिव्य करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी प्रतिमा याच दौऱ्यातून तयार करण्यात येत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.