‘व्हॉट्सअप चॅट बॉट’वर मिळणार बीएमसीच्या 80 पेक्षा अधिक सुविधांची माहिती, नवा उपक्रम काय? वाचा सविस्तर
या सुविधेमुळे 80 पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम आहे अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून (Bmc) मुंबईकरांना आज मोठं गिफ्ट देण्यात आलंय. मुंबई महापालिकेने आजपासून नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना याप्रसंगी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक शिवनाथ ठुकराल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.
‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ नेमका उपक्रम काय?
या सुविधेमुळे 80 पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम आहे अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. कोविड युद्ध लढतांना आय.टीच्या सुविधा खुप महत्वाच्या आहेत. नागरिकांना घरी बसून गणपती परवाना, लायसन फी, वॉर्ड नंबरची माहिती मिळणे, वॉर्ड ऑफीसरचे नाव व इतर प्रश्न त्यांना या व्हॉटसअप चॅटद्वारे सुटण्यास मदत होणार आहे. ही माहिती देतांना महापालिकेच्या व व्हॉटसअप टीमच्या लोकांनी अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी बजावले.
ही सेवा 24 तास सुरू राहणार
मुंबई महापालिकेची ही सेवा 24 तास सुरू राहणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते. मुंबईकरांना नागरी सेवा सुविधा तत्परपणे उपलब्ध करून देण्यात महापालिका नेहमीच अग्रेसर आहे. संक्रमणात नवीन काही तरी शोधणे अपेक्षित आहे, त्यामुळे आजचा दिवस अतिशय औचित्यपूर्ण आहे. महापालिकेचे आय.टी कक्ष, अधिकारी कर्मचारी कौतूकास पात्र आहे, मुख्यमंत्री नेहमीच मुंबईकरांना नवनवीन सुविधा देण्यासाठी आग्रही असतात. त्यातूनच कोस्टलरोडचे काम असो की आयटी सुविधा देण्याचे काम असो त्या सर्व गोष्टी सुरु राहिल्या. असेही त्या म्हणाल्या.
अस्लम शेख काय म्हणाले?
महापालिकेच्या सुविधांचा आज मुंबईकरांना घरी बसून लाभ मिळेल, याचा विशेष आनंद आहे. आय.टी क्षेत्रात भारताचे लोक जगात अग्रेसर आहेत. दुबई पेपरलेस झाले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका दुबई प्रमाणे पेपरलेस व्हावी. साध्या साध्या गोष्टीसाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन चकरा मारणे या उपक्रमामुळे थांबले. यामुळे टेंडरप्रक्रियाही अधिक पारदर्शी झाली. अशी प्रतिक्रिया अस्लम शेख यांनी यावेळी दिली.