मोठी बातमी! दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘त्या’ महिलेचे संबंध, एनआयएकडून तपास करा; राहुल शेवाळे यांचे गंभीर आरोप
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मी या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तसेच अनिल परब यांना पोलीस स्टेशनला पाठवून माहिती करून घेतली होती.
मुंबई: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. मात्र, या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणाची गंभीर माहिती दिली. सदर फॅशन डिझायनर महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातील गँगशी संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच या प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशाी करण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक माहिती दिली. तसेच सदर महिलेची पोलखोल केली. ही पोलखोल करताना शेवाळे यांनी काही ऑडिओ क्लिप ऐकवून या महिलेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही पोलखोल केली आहे.
महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या गँगमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे. रईस आणि जावेद छोटाली नावाच्या व्यक्ती सोबत ती काम करते. रईस आणि छोटालीसोबत तिचे संबंध आहेत. ती दोघांना परिचित आहे. हे साधंसुधं प्रकरण नाही हा आंतरराष्ट्रीय कट आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.
ही महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेची दाऊद आणि पाकिस्तानशी लिंक आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. हे प्रकरण गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएच्या माध्यमातून करावा. त्यातून इंटरनॅशनल रॅकेटचा पर्दाफाश होईल, असा दावा शेवाळे यांनी केला आहे.
माझा संसार ठाकरेंनी वाचवला असं युवा सेनाप्रमुख सांगत आहेत. पण या महिलेला युवासेनाप्रमुखच पाठिशी घालत आहेत. असं केल्याने कुणाचं लग्न वाचतं का? एखाद्याचं आयुष्यच बर्बाद होईल ना? युवासेनाप्रमुखांची विधानेच तशी आहेत, असंही ते म्हणाले.
या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा असा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासूच प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची सर्व खात्री करून घेतली होती. या महिलेची कौटुंबीक पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. तिचा भाऊ गंभीर गुन्ह्यात तुरुंगात आहे. ती मुंबई पोलिसांना सापडत नाही. तिच्या पत्त्यावरही पोलीस जाऊन आले. पण ती सापडत नाही. राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मात्र ती सापडली. ती राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला कशी सापडली? असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रवादी पक्ष या प्रकरणाच्या पाठिशी आहे. राष्ट्रवादीचा दाऊदशी सबंध आहे. त्यांचा मंत्री दाऊदशी संबंधित असल्यामुळे तुरुंगात आहे. महिलेच्या वकिलाच्या संभाषणातही नवाब मलिक यांचा उल्लेख आहे. यावरून काय तो अर्थ काढता येतो, असं सांगतानाच शेवाळे यांनी वकिलाच्या संभाषणाची क्लिपच ऐकवली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मी या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तसेच अनिल परब यांना पोलीस स्टेशनला पाठवून माहिती करून घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला आहे.
या प्रकरणात काही दम नसल्याचं माहीत असूनही केवळ शिवसेना सोडल्यामुळे युवासेना प्रमुखांच्या मनात राग आहे. मी संसदेत एयू उल्लेख केला. त्यामुळे युवासेनाप्रमुखांना राग आला आहे. म्हणूनच मला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण वारंवार काढलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.