अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा; संजय राऊत यांचा घरचा आहेर
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ईव्हीएम मशीनला विरोधकांनी विरोध केला आहे. त्यावर अजित पवारांचा विश्वास असेल. पण देशातील जनतेचा नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : ईव्हीएम मशीन वापराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बांगलादेशाने ईव्हीएम मशीन बंद केली आहे. विरोधी पक्षांनी मागणी करताच बांगलादेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. याला लोकशाही म्हणतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर ईव्हीएम मशीनचा गैरवापर होतो तर दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि बांगलादेशात विरोधी पक्षाची सरकारे कशी आली? असा सवाल अजित पवार यांनी राऊत यांना केला आहे. अजितदादांच्या या प्रश्नाला आता राऊत यांनी उत्तर दिलं आहे. अजितदादांची भाजपच्या अंधभक्तात गणना होऊ नये, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. शरद पवारांच्या घरी दिल्लीत बैठक झाली होती. ईव्हीएमच्या घोटाळ्यावर ही बैठक झाली होती. ईव्हीएमवर सर्वच विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाला काही प्रश्नही विचारले आहेत. अजित पवार यांना ईव्हीएमवर विश्वास असेल तर असू द्या. पण देशातील जनतेला नाही. जे भाजपचे भक्त आणि अंधभक्त आहेत त्यांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. अजित पवार यांची गणना अंधभक्तात होऊ नये असं वाटतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
विस्तार होणं कठिण
शिंदे गटातील एक मोठा गट अस्वस्थ आहे. आमदारांचा मोठा गट दौऱ्यात गेला नाही. ते अस्वस्थ आहेत. काही तरी गडबड सुरू आहे. काय गडबड आहे ते कळेल, असं राऊत म्हणाले. तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणं कठीण आहे, असा दावाही त्यांनी केला.
या गोष्टी दुसऱ्यांना सांगा
शेतकरी त्रस्त आहेत. पण सरकार लखनऊमध्ये आहे. योगींचा पाहुणचार घेत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात नुकसान झालं आहे. गहू, डाळिंब, द्राक्ष, भाज्या, फळं उद्ध्वस्त झाले आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत. असायला हरकत नाही. श्रद्धा असेल तर. मी इथून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. या गोष्टी दुसऱ्यांना सांगा. दिल्लीत जाऊन तुमच्या बॉसला सांगा. शेतकऱ्यांना सांगू नका. शेतकरी खवळले आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
तसं करायचं का?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या बापावर बोलावं. दुसऱ्यांच्या बापावर बोलू नये. त्यांना बाळासाहेबांवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नये. गद्दारांना रस्त्यात गाठून त्यांचे कपडे फाडून मारा असं बाळासाहेब म्हणायचे. बाळासाहेबांच्या या विचारांचे पालन करायचे का? गद्दारांना रस्त्यात गाठून मारायचं का? गद्दारांना ज्या प्रकारची सुरक्षा दिली आहे. ती एखाद्या राष्ट्रभक्तालाही मिळत नाही. इमानदार आहात तर भीती कसली आहे? गद्दारांना रस्त्ययात पकडून मारा असं बाळासाहेब म्हणाले होते. तेच लोक करतील म्हणून हे घाबरत आहेत, असंही ते म्हणाले.