आमचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार; राजकीय भूकंपावर भाजपचा पलटवार
मुंबई महापालिकेतील भाजपचे 15 ते 20 नगरसेवक लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला होता. (Mumbai 15 to 20 BJP corporators will join Shiv Sena in december, bhalchandra shirsat reply to shivsena)
मुंबई: मुंबई महापालिकेतील भाजपचे 15 ते 20 नगरसेवक लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला होता. त्यावर भाजपने पलटवार केला आहे. शिवसेनेचा हा दावा केवळ फुसका बार आहे, असं भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे.
भालचंद्र शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेले 25 वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत. स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा सणसणीत टोला भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे.
भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही
शिवसेनेला मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्यामुळेच पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव लोखंडे, मध्य दक्षिण मुंबईसाठी विद्याधर गोखले, सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ताडदेव महापालिका प्रभागासाठी अनिल सिंग, अंधेरीतील नगरसेविका संध्या सुनिल यादव असे 35 ते 40 उमेदवार वेळोवेळी दिलेले आहेत. आताही शिवसेनेला योग्य उमेदवारांची वानवा आहे म्हणूनच ते फोडाफोडीची भाषा करित आहेत. भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा दावा काय?
शिवसेनेचे पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. मी एक सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय, असा दावा यशवंत जाधव यांनी केला होता.
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 October 2021 https://t.co/kcLRcKFyUf #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
संबंधित बातम्या:
डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंप? भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, यशवंत जाधवांचा दावा
‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते’, तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन चित्रा वाघांचा जोरदार टोला
(Mumbai 15 to 20 BJP corporators will join Shiv Sena in december, bhalchandra shirsat reply to shivsena)