मुंबई, नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मेगा प्लॅन, 15 हजार कोटींचा काय आहे प्रकल्प?
mumbai navi mumbai airport : नवी मुंबईतील विमानतळ आणि मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ एकमेकांना जोडण्यासाठी काम सुरु झाले आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसेही वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 15 हजार कोटी रुपये आहे.
मुंबई : नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळ आणि मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्यासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. 15,000 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प यासाठी तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 9 लाख प्रवासी दररोज प्रवास करू शकतील. दोन्ही विमानतळांचे आंतर 35 किमी आहे. हे आंतर पूर्ण करण्यासाठी फक्त ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासाठी काम करत आहे.
काय आहे प्रकल्प
नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळ आणि मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या दोन संस्थांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. ही एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन 35 किमी लांबीची असणार आहे. यामुळे 9 लाख प्रवासी दररोज प्रवास करू शकतील. या प्रकल्पासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.
असे आहे नियोजन
MMRDA दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते मानखुर्द (11.1 किमी) पर्यंत मेट्रो लाईन 8 कॉरिडॉर बांधणार आहे. तर शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचा विस्तार करणार आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक सोपा आणि कमी वेळेत होणार आहे.
प्रकल्प असणार भूमिगत
मेट्रो मार्ग मुंबईच्या दिशेने अर्धवट भूमिगत असेल. घाटकोपरमधील अंधेरी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा मार्ग भूमिगत होण्याची शक्यता आहे. घाटकोपर ते मानखुर्द हा घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडमार्गे उन्नत करण्यात येणार आहे.
2025 मध्ये सुरु होणार नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. नवी मुंबई विमानतळाचे कॉमर्शियल ऑपरेशन 2025 पासून सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही विमानतळांना जोडणारा कोणताही मार्ग नाही. यामुळे मेट्रोच्या माध्यमातून प्रवाशांना मोठी सुविधा होणार आहे. त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.